…तर मुख्यमंत्री महोदय महाजनादेश यात्रा अर्ध्यातच सोडाल: धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 03:49 PM2019-08-01T15:49:58+5:302019-08-01T15:51:51+5:30
बेरोजगारीने पिचलेल्या तरुणांना भेट द्या. तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही. अशी टीका मुंडे यांनी केली आहे.
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आजपासून सुरु झाली आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता मोझरी येथून या यात्रेला प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या यात्रेला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय तुमच्या यात्रेला शुभेच्छा, मात्र वेळ मिळाल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची सुद्धा भेट घ्या, असा खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री महोदय तुमच्या यात्रेला शुभेच्छा, जमल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, कर्जमाफीच्या नावावर फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांना, उद्ध्वस्त झालेला कष्टकऱ्यांना, बेरोजगारीने पिचलेल्या तरुणांना भेट द्या. तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही. अशी टीका मुंडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री महोदय तुमच्या यात्रेला शुभेच्छा! जमल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना, कर्जमाफीच्या नावावर फसवणूक केलेल्या शेतकऱ्यांना, उद्ध्वस्त झालेला कष्टकऱ्यांना, बेरोजगारीने पिचलेल्या तरुणांना भेट द्या. तुम्हाला तुमची यात्रा पुढे नेण्याचे धाडसही होणार नाही! pic.twitter.com/L7CkbnnxCA
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 1, 2019
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ हजारहून अधिक किलोमीटर प्रवास करणार आहेत. या यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. मात्र मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेला धनंजय मुंडेनी यांनी शुभेच्छा देत टीका केली आहे.