पंकजांचा पुन्हा धनंजय मुंडेंना शह; उमेदवारी मिळालेल्या नमिता भाजपमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:05 PM2019-09-30T14:05:55+5:302019-09-30T14:06:56+5:30
धनजंय मुंडे यांच्या सोबत जिल्ह्यातच दुसऱ्यांदा दगाफटका झाला आहे. त्यामुळे बहिण पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे आगामी निवडणुकीत कशी रणनिती आखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- रवींद्र देशमुख
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षांतराचे लागलेले ग्रहण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुटले नसल्याची स्थिती आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंदडा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा मतदार संघात आधीच होती. तरी पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर करणे आश्चर्याचा धक्का होता. मात्र या निमित्ताने धनंजय मुंडे यांना जिल्ह्यात उमेदवारीच्या बाबतीत दुसऱ्यांदा शह देण्यात पंकजा मुंडे यांना यश आले आहे.
पक्षप्रमुख शरद पवारांनी बीड जिल्ह्यातील उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यापूर्वी पवारांनी सहाजिकच जिल्ह्यातील स्थनिक नेत्यांशी चर्चा केली असणार आहे. बीड जिल्ह्यात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे जबाबदार नेते आहेत. उमेदवारीच्या बाबतीत त्यांची भूमिकाही महत्त्वाची होती. असं असताना धनंजय मुंडे यांना देखील नमिता मुंदडा यांचा कल लक्षात न येणे ही राष्ट्रवादीसाठी गंभीर बाब आहे. आता अर्ज भरण्यासाठी काही दिवसच मुदत असून राष्ट्रवादी पक्षाला यांची किंमत मोजावी लागू शकते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील धनंजय मुंडे यांना चांगलाच दणका बसला होता. धनंजय मुंडे यांनी प्रयत्न करून ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळवून दिली, त्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. किंबहुना पंकजा मुंडे यांनीच राष्ट्रवादीचा उमेदवार फोडला. त्यानंतर पुरेसे संख्याबळ नसताना देखील पंकजा यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपमध्ये आलेल्या सुरेश धस यांनी विजयी केले.
सुरेश धस यांच्या विजयामुळे आणि उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवार सत्ताधारी पक्षाला जावून मिळणे ही राष्ट्रवादीसाठी मोठी नाचक्की होती. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडेच विधान परिषदेच्या त्या जागेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकीत देखील त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. जिल्ह्यातील उमेदवारी सहाजिक मुंडे यांना विश्वासात घेऊन देण्यात आली असणार आहे. विशेष म्हणजे नमिता मुंदडा यांचा कल भाजपकडे असल्याच्या चर्चा बीडमध्ये होती.
एकूणच धनजंय मुंडे यांच्या सोबत जिल्ह्यातच दुसऱ्यांदा दगाफटका झाला आहे. त्यामुळे बहिण पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे आगामी निवडणुकीत कशी रणनिती आखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.