धनंजय मुंडेंना दणका! घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे न्यायालयाने ठरवले प्रथमदर्शनी दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 05:22 IST2025-02-07T05:21:33+5:302025-02-07T05:22:26+5:30

Dhananjay Munde-Karuna sharma case: करुणा पहिली पत्नी, दरमहा २ लाख रुपये देखभाल खर्च देण्याचे निर्देश 

Dhananjay Munde gets a blow! Bandra court finds him prima facie guilty in domestic violence case | धनंजय मुंडेंना दणका! घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे न्यायालयाने ठरवले प्रथमदर्शनी दोषी

धनंजय मुंडेंना दणका! घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे न्यायालयाने ठरवले प्रथमदर्शनी दोषी

मुंबई : करुणा शर्मा यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचे निरीक्षण नोंदवत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये, तर त्यांच्या मुलीसाठी ७५ हजार रुपये अंतरिम देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश गुरुवारी दिले. तर मुलगा २१ वर्षांचा असल्याने न्यायालयाने त्याच्यासाठी देखभालीचा खर्च देण्यास नकार दिला.

धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा त्यांच्या पत्नी नसल्याचा दावा केला असला, तरी १८ जुलै २०१७ मध्ये केलेल्या वसीहतनाम्यात करुणा शर्मा पहिली पत्नी व राजश्री मुंडे दुसरी पत्नी असल्याचे मान्य केले आहे. तसेच एका स्वीकृतीपत्रात मुंडे यांनी करुणा यांच्याशी ९ जानेवारी १९९८ रोजी विवाह केल्याचे मान्य केले आहे. 

२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात करुणा यांची मुले आपल्यावर अवलंबून असल्याचे नमूद केले आहे. या सर्व कागदपत्रांवरून मुंडे यांनी करुणा यांच्याशी विवाह केल्याचे दिसते.

हा विवाह कायदेशीर आहे की नाही, हे सादर होणाऱ्या कागदपत्रांवरून नंतर सिद्ध होईल,’ असे निरीक्षण दंडाधिकारी ए. बी. जाधव यांनी नोंदविले. मुंडे यांनी आपल्याला मारहाण केली असून, वैवाहिक अधिकारांपासून वंचित ठेवले, अशी तक्रार करीत करुणा यांनी दरमहा १५ लाख रु. देखभाल खर्च मागितला.  २०२२ पासून प्रलंबित अर्जावर गुरुवारी न्यायालयाने अंतरिम आदेश दिले.

मुंडेंचा युक्तिवाद फेटाळला

करुणा शर्मा कपड्याच्या व्यापारी असून तीन कंपन्यांच्या संचालक आहेत. त्या आर्थिक सक्षम आहेत. दोन्ही मुले सज्ञान आहेत. त्यांनाही देखभालीच्या खर्चाची आवश्यकता नाही, हा मुंडे यांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. 

निवडणूक आयोगापुढे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुंडे यांचे उत्पन्न करुणा यांच्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. मुले सज्ञान असली तरी मुलीला विवाह होईपर्यंत दरमहा ७५ हजार तर करुणा यांना १.२५ लाख रु. देखभालीचा खर्च देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

घरगुती हिंसाचार झाला; न्यायालयाचे निरीक्षण

धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांचा विवाह झाल्याचे कागदपत्रांवरून दिसते. तरी त्यांच्याशी विवाह केल्याचे धनंजय मुंडे नाकारत आहेत. त्यांनी न्यायालयातही करुणा आपल्या पत्नी नसून त्यांचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली. करुणा यांचा मुलगा व मुलगी आपल्यावर अवलंबून असल्याचे निवडणूक आयोगापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परंतु करुणा यांना त्यांनी वैवाहिक अधिकारांपासून वंचित ठेवले. वैवाहिक अधिकारांपासून वंचित ठेवणे, हासुद्धा एक घरगुती हिंसाचार आहे. 

प्रतिज्ञापत्रानुसार दोघेही २०२० पासून स्वतंत्र राहत आहेत. दोघांमधील संबंध ताणलेले आहेत, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. करुणा यांच्याशी विवाह झाल्याचे नाकारून मुंडेंनी त्यांचे भावनिक शोषण केले आहे, हासुद्धा घरगुती हिंसाचार आहे. करुणा यांनी त्यांच्यावर प्रथमदर्शनी घरगुती हिंसाचार झाल्याचे सिद्ध केले आहे.

करुणा शर्मा यांच्याशी वैवाहिक संबंध नाकारल्यानंतर त्यांना बीडमध्ये येण्यास मनाई करण्यात आली. त्या तिथे गेल्यावर मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शर्मा यांना भविष्यात त्यांच्यावर मुंडे घरगुती हिंसाचार करतील, अशी भीती आहे. त्यामुळे मुंडे यांनी शर्मा यांच्यावर घरगुती हिंसाचार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

वाल्मीक कराडकडूनही मारहाण

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मुंडे व पोलिसांसमोर वाल्मीक कराडने मला मारहाण केली. अंगाला गैरस्पर्श केला. मी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व पोलिस महासंचालकांकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. अजून ते मिळाले नाही, असा आरोप करुणा शर्मा-मुंडे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.

 मी त्यांची पहिली पत्नी आहे हे मी अनेक दिवसांपासून सांगत होते. न्यायालयीन लढाईतही मला विजय मिळाला आहे. मी दरमहा १५ लाखांच्या पोटगीची मागणी केली होती, त्यामुळे दोन लाख देण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही. हायकोर्टात दाद मागणार आहे. -करुणा शर्मा-मुंडे

Web Title: Dhananjay Munde gets a blow! Bandra court finds him prima facie guilty in domestic violence case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.