बोगस वाण विक्रीची तक्रार व्हॉटस्ॲपवर नोंदवा, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:14 AM2024-06-10T08:14:20+5:302024-06-10T08:15:05+5:30
Dhananjay Munde News: कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्याविरुद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाॅट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्याचे निर्देश दिले.
मुंबई - कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्ती करणाऱ्याविरुद्ध शेतकऱ्यांसाठी ‘कृषी तक्रार व्हाॅट्सॲप हेल्पलाईन क्रमांक’ जारी करण्याचे निर्देश दिले. यासाठी कृषी विभागाकडून ९८२२४४६६५५ हा व्हाॅट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तक्रारकर्त्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाणार आहे.
राज्यात कुठेही कृषी निविष्ठा विक्रेते शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे बियाणे किंवा खत घेण्याची सक्ती करीत असतील, बी-बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करीत असतील, अनावश्यक वस्तू खरेदी करण्याची सक्ती करीत असतील, एखादे बोगस वाण विक्री करीत असतील किंवा शेतकऱ्यांच्या अन्य काही तक्रारी असतील, तर अशा विक्रेत्यांविरुद्ध तक्रारी ह्या दुकानाचे नाव, ठिकाण, तालुका, जिल्हा यांसह उपलब्ध असलेल्या पुराव्यासह वरील व्हाॅट्सॲप क्रमांकावर पाठवावेत. त्या प्रत्येक तक्रारीची तातडीने दखल घेऊन, त्याची शहानिशा करून त्यावर कारवाई केली जाईल, त्याचबरोबर तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.