'जनतेचं घेण-देण नाही; मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणूक जिंकायची'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 05:42 PM2019-09-26T17:42:34+5:302019-09-26T18:00:56+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का ? त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला.
मुंबई - बुधवारी रात्री पुण्यामध्ये अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शहरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत गेले आहेत. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील जनतेने 'या' सरकारचे काय घोडे मारले आहे हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे अशी खोचक टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का ? त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, पुण्यात प्रचंड पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर ११ लोकांचा मृत्यू झाला असून, राज्याचे मुख्यमंत्री मात्र दिल्लीत बसले असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का? मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का? @CMOMaharashtra@BJP4Maharashtra@MiLOKMAT@LoksattaLive@abpmajhatv@JaiMaharashtraN@zee24taasnews@TV9Marathi
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 26, 2019
तर पश्चिम महाराष्ट्राच्या पूरपरिस्थितीच्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हेच केले होते. राज्यातील जनतेने भाजप सरकारचे काय घोडे मारले आहे. असा प्रश्न उपस्थित करत मुंडे यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पुणे व परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भिषण परिस्थिती निर्माण झाली असताना तेथील नागरिकांना मदत करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना निवडणूकांची काळजी असल्याचा आरोप सुद्धा मुंडे यांनी यावेळी केला.