OBC Reservation : ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:05 PM2022-07-20T16:05:22+5:302022-07-20T16:14:34+5:30
Dhananjay Munde And OBC Reservation : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व वैयक्तिक आम्ही देखील ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नकोत, किंवा त्या घेतल्याच तर आम्ही निवडणूक लढवत असलेल्या ठिकाणी 27% जागा ओबीसी उमेदवारांना देऊ, अशी भूमिका यापूर्वीच घेतली होती.
परळी - महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारसी स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 27% ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे, या निर्णयाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वागत केले आहे.
महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालासह ट्रिपल टेस्ट व अन्य बाबी सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या असून, ओबीसींच्या 27% पर्यंत मर्यादेतील आरक्षणासह निवडणुका 2 आठवड्यात जाहीर कराव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व वैयक्तिक आम्ही देखील ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नकोत, किंवा त्या घेतल्याच तर आम्ही निवडणूक लढवत असलेल्या ठिकाणी 27% जागा ओबीसी उमेदवारांना देऊ, अशी भूमिका यापूर्वीच घेतली होती. त्यामुळे आज या निकालाचा आनंद आहे, पक्षस्तरावर व व्यक्तिगत रित्या मी या निकालाचे स्वागत करतो, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.