Dhananjay Munde : मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडेंना संधी मिळणार?; धनंजय मुंडेंचं मोठं विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 05:15 PM2022-10-20T17:15:03+5:302022-10-20T17:33:34+5:30
Dhananjay Munde : भाजपाकडून पंकजा मुंडेंना संधी दिली जाऊ शकते. अशी संधी मिळाल्यास त्या राज्यात फिरतील का? असा प्रश्न पत्रकारांकडून धनंजय मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.
राज्यात भाजपा सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी मागणी केली आहे. परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे. याच दरम्यान आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मोठं विधान केलं आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता सुरू असून त्यात भाजपाकडून पंकजा मुंडेंना संधी दिली जाऊ शकते. अशी संधी मिळाल्यास त्या राज्यात फिरतील का? असा प्रश्न पत्रकारांकडून धनंजय मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. "याआधीही पंकजा मुंडे या मंत्रिमंडळात होत्या. आता पुन्हा संधी मिळाल्यास त्या राज्यात फिरतील की नाही आणि त्यांना खरंच काम करायचंय का?, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा. भाजपा काय मला विचारून मंत्र्यांची यादी ठरवत नाही. तसं झालं असतं तर मला आनंदच झाला असता" असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
दसऱ्यानिमित्त बीडमधील सावरगाव येथे आयोजित मेळाव्यामध्ये याआधी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. सातत्याने डावलले गेल्याने असलेली नाराजीच्या चर्चा, पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या यावर पंकजा मुंडे यांनी सभेतून रोखठोक भाष्य केलं होतं. मी नाराज नाही. ज्या संस्काराच्या मुशीतून आपल्या देशाचे नेते आले आहेत त्याच संस्कारांच्या मुशीतूनच मी आले आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही तर संघटन श्रेष्ठ आहे, त्यावर माझा विश्वास आहे. आता मी २०२४ च्या तयारीला लागले आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
पंकजा मुंडे समर्थकांना संबोधित करताना म्हणाल्या की, मी हात जोडून विनंती करते की आता हे नाराजीचे विषय बंद करा. ज्या संस्काराच्या मुशीतून आपल्या देशाचे नेते आले आहेत त्याच संस्कारांच्या मुशीतूनच मी आले आहे. मीसुद्धा १७ वर्षे राजकारणात आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही तर संघटन श्रेष्ठ आहे, त्यावर माझा विश्वास आहे. हा नियम सर्वांना लागू आहे. राजा असेल वा रंक सर्वांनाच हाच नियम आहे आणि मलाही तोच लागू आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.
त्या पुढे म्हणाल्या की, आता या चर्चा बंद करा. प्रसारमाध्यमांनीही यापुढे कुठल्याही आमदारांची यादी आली तर माझं नाव चालवू नये. मी तुमच्या पाया पडते. मी आता २०२४ च्या तयारीला लागले आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा होतात. पण मी कुणावर नाराज आहे? कुणावर नाराज होऊ मी? मात्र दसरा मेळाव्याला तुम्ही आला नाही, तर मी नाराज होईन. मी नाराज नाही. नाराज व्हायला हे घरगुती भांडण आहे. राजकारणात मोठमोठ्या लोकांना संघर्ष करावा लागलाय. तुमच्या लेकीच्या वाट्यालाही हा संघर्ष आलाय. आता संघर्ष करायचा आणि वेळेची वाट पाहायची, असा सूचक सल्लाही पंकजा मुंडे यांनी दिला होता.