जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते पाहावे लागेल, शुद्धीत आल्यावर...; धनंजय मुंडेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:11 PM2024-01-08T13:11:24+5:302024-01-08T13:12:34+5:30
NCP Dhananjay Munde Vs Jitendra Awhad: एखादा माणूस शुद्धीत नसल्यावर चुकीचे बोलतो, काहीही बरळतो, शुद्धीवर आल्यावर खरे कबूल करतो, तसाच हा प्रकार आहे, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला.
NCP Dhananjay Munde Vs Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांबाबत केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. जोरदार टीका झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आपल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली. काही पुरावे दाखवत जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले. यातच आता अजित पवार गटाचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत, खोचक शब्दांत टीका केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, तुम्ही देवाला मानता. देव सर्वांचा आहे. प्रभू रामचंद्रांबाबत देशवासीयांच्या मनात आगळे-वेगळे स्थान आहे. त्या प्रत्येकाच्या भावना दुखावणे, एवढेच काम असेल आणि आपल्या मतदारसंघातील ठराविक मतदारांसाठी चुकीची विधाने केली. आता त्यावेळी कोण काय खात होते, याचे ते साक्षीदार होते का? त्यांचे आजोबा काय जेवत होते, याचे तरी ते साक्षीदार आहेत का? मीही अशा घटनांचा साक्षीदार नाही. त्यामुळे कोणी काय खावे आणि काय नाही, याबाबत बोलणे योग्य नाही, या शब्दांत धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला.
जितेंद्र आव्हाड कोणत्या अवस्थेत बोलले ते पाहावे लागेल, शुद्धीत आल्यावर...
जितेंद्र आव्हाड यांनी कोणत्या अवस्थेत ते वक्तव्य केले, कोणत्या अवस्थेत माघार घेतली, ते पाहावे लागेल. ज्या अवस्थेत ते आधी बोलले ती अवस्था आणि माघार घेतली तेव्हाची त्यांची अवस्था काय होती ते पाहायला हवे. एखादा माणूस शुद्ध नसल्यावर चुकीचे बोलतो, बेशुद्ध असल्यावर काहीही बरळतो, परंतु, शुद्धीवर आल्यावर खरे कबूल करतो, तसाच हा प्रकार आहे. हे सगळे गोंधळात टाकणारे आहे, असे सांगत धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त विधान केल्याने राजकीय गदारोळ झाला. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या विधानावरून विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर गुरुवारी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर आव्हाड हे दुतोंडी साप असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली.