सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहे : धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 12:13 PM2019-07-03T12:13:15+5:302019-07-03T12:24:12+5:30
तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
मुंबई - काल रात्री नऊच्या सुमारास तिवरे धरण फुटलं. धरण फुटल्यानं परिसरात भितेचे वातवरण पसरले आहे. यामध्ये २४ जण वाहून गेले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत ६ जणांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर यावरून विरोधक आक्रमक होताना दिसत आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानं यामध्ये २४ जण वाहून गेले. मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती मदत पथकाला पाचारण करण्यात आले असून वाहून गेलेल्यांपैकी आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे आता विरोधकांनी सरकारवर निशाना साधला आहे. चिपळूणच्या घटनेत सरकारने तातडीने मदत करावी. सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला आहे. तर आता पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ही मुंडे म्हणाले.
रत्नागिरीतील चिपळूणमधील तिवरे धरण फुटून ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. भावपूर्ण श्रद्धांजली! अद्याप १६ जणं बेपत्ता आहे. सरकारने तातडीने मदत करावी. सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहेत. परत स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न उपस्थित होतोय. जागे व्हा सत्ताधाऱ्यांनो! pic.twitter.com/obucDo0UtA
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 3, 2019
तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे ही गिरीश महाजन म्हणाले.