Dhananjay Munde : "मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही लेकिन..."; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 02:10 PM2022-11-05T14:10:13+5:302022-11-05T14:22:16+5:30

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारला सत्ता व सरकार कायमचे कोणाचेच नसते व देशाच्या इतिहासात सर्वांचेच योगदान आहे, तो इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, याची आपल्या हटके अंदाजात आठवण करून दिली. 

Dhananjay Munde Slams Shinde Fadnavis Government Over farmers | Dhananjay Munde : "मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही लेकिन..."; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

Dhananjay Munde : "मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही लेकिन..."; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

googlenewsNext

शिर्डी - "मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही, लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोडी है 
जो आज साहिबे मसनद है कल नही होंगे, किरायदार है जाती मकान थोडी है
सभी का खून है शामिल यहा की मिट्टी मे किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है" राहत इंदौरी यांच्या या शायरीच्या माध्यमातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारला सत्ता व सरकार कायमचे कोणाचेच नसते व देशाच्या इतिहासात सर्वांचेच योगदान आहे, तो इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, याची आपल्या हटके अंदाजात आठवण करून दिली. 

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 'राष्ट्रवादी मंथन - वेध भविष्याचा' हे दोन दिवसीय अधिवेशन सुरू असून आज या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी आपले विचार मांडले. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी करत, सुरत गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबई या शिंदे सरकार स्थापनेपूर्वीच्या घटनाक्रमावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. हे सरकार केवळ स्वार्थ आणि खोके यासाठीच स्थापन झाले असून याची जाणीव आता सर्वसामान्य माणसाला देखील झाली असल्याने, ते कोणालाच भावत नाहीये, असेही म्हणायला धनंजय मुंडे विसरले नाहीत. 

दरम्यान राज्य सरकार आपापसात सगळं काही अलबेल आहे हे दाखवायची कसरत करत असताना राज्याची परिस्थिती मात्र हाताबाहेर जाताना दिसत आहे. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने राज्यातील शेतकरी अक्षरश: कोलमडून पडला असून सरकारची शेतकऱ्यांना कसलीही मदत झाली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करायला जर हे सरकार असमर्थ असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करेल; असा इशाराही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला.

वेदांता - फॉक्सकॉन पाठोपाठ एका मागून एक मोठ मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर अन्य राज्यांमध्ये जात असून ते रोखण्यासाठी राज्य सरकार काहीही करत नाही, हे स्पष्ट दिसत आहे; परंतु यामुळे लाखो युवकांना मिळणारे रोजगार मात्र एक प्रकारे हिरावूनच घेतले आहेत, हे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे एकमेकांवर आरोप करत बसण्यापेक्षा राज्य सरकारने महाराष्ट्र बाहेर गेलेल्या प्रकल्पातून जेवढी रोजगार निर्मिती होणार होती, तेवढे रोजगार राज्यातील तरुणांना उपलब्ध करून देण्याचा ठराव आगामी अधिवेशनात करावा, अशी मागणीही करणार असल्याचे धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. 

खासदार शरद पवार हे देशाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व असून विविध राज्यांनी आपल्या राज्यातील नेतृत्वाला संपूर्ण पाठिंबा देऊन दिल्लीश्वराविरोधात लढण्यासाठी ताकद दिली आहे; याची ममतादीदींसारखे अनेक उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे आता सबंध महाराष्ट्र देखील पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात काम करण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Dhananjay Munde Slams Shinde Fadnavis Government Over farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.