कराडांच्या माघारीमुळे धनंजय मुंडे तोंडघशी, काटशहाच्या राजकारणात पंकजा मुंडे भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:42 AM2018-05-10T04:42:51+5:302018-05-10T04:42:51+5:30
ऐनवेळी रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच तोंडघशी पडली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आठ दिवसातच आपल्या भावाला लागोपाठ दुसरा धक्का देत मुत्सद्देगिरीत आपणच वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.
- अतुल कुलकर्णी
बीड : ऐनवेळी रमेश कराड यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच तोंडघशी पडली आहे. शह-काटशहाच्या राजकारणात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आठ दिवसातच आपल्या भावाला लागोपाठ दुसरा धक्का देत मुत्सद्देगिरीत आपणच वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.
रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आणि गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर अनुयायी. मात्र काँग्रेसकडे असलेला विधान परिषदेचा उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य मतदार संघ राष्ट्रवादीला सोडवून घेत आणि रमेश कराड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देऊन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बाजी मारली होती. तर आघाडी सरकारमधील माजी मंत्री सुरेश धस यांना भाजपाची उमेदवारी देऊन मंत्री पंकजा मुंडे यांनी जशाच तसे उत्तर दिले होते. एकेकाळी जिवलग मित्र असलेल्या धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात अलीकडे आडवा विस्तव जात नव्हता. दोघांच्या वर्चस्वाच्या लढाईत सुरेश धसांनी जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडीत भाजपला साथ देत चांगलेच उट्टे काढले होते. तर ऐनवेळी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दहा मिनिटे अगोदर रमेश कराड यांनी माघार घेऊन सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी आपली उमेदवारी का मागे घेतली? याचे कोडे अजून तरी उलगडले नाही.