धनंजय मुंडेंना भोवले ‘आका’शी निकटचे संबंध; फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर दिला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 05:58 IST2025-03-05T05:57:38+5:302025-03-05T05:58:43+5:30
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ८५ दिवसांपासून चर्चेत, धनंजय मुंडेंनी एकदाही घेतली नाही देशमुख कुटुंबीयांची भेट

धनंजय मुंडेंना भोवले ‘आका’शी निकटचे संबंध; फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर दिला राजीनामा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/बीड :वाल्मीक कराड म्हणजे ‘आका’ आणि धनंजय मुंडे म्हणजे ‘आकाचा आका’, असे सूत्र भाजपचे आ. सुरेश धस यांनी लावले होते. या दाेघांचे व्यावहारिक नातेही त्यांनी समोर आणले होते. मुंडे यांनीही कराड हा निकटवर्तीय असल्याचे जाहीर केले होते. आता हा ‘आका’च संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ‘मास्टर माइंड’ असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून सिद्ध झाले. त्यामुळे हा आका जेलमध्ये आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीही दबाव वाढला होता. अखेर या ‘आकाच्या आका’चाही मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा झाला. ८५ दिवसांपासून देशमुख प्रकरण चर्चेत आहे.
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची भर दुपारी अपहरण करून हत्या झाली. या प्रकरणात अजित पवार गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याचे नाव येताच मुंडे यांच्यावर आरोप सुरू झाले. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी वाल्मीक कराडविरोधातही दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला. दीड महिन्यानंतर कराडसह इतर नऊ आरोपींवर संतोष देशमुख यांची हत्या केल्या प्रकरणात मकोका लावला आणि मुंडे यांच्या अडचणीत वाढ होत गेली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी, विरोधकांनी लावून धरली. अखेर मंगळवारी सकाळी मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला.
देशमुख कुटुंबाची भेट टाळली
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातील मंत्री, नेत्यांसह इतर क्षेत्रातील लोकांनी कुटुंबाची मस्साजोगमध्ये जाऊन भेट घेतली. परंतु, मुंडे यांनी एकदाही देशमुख कुटुंबाची गावात जाऊन भेट घेतली नाही. त्यामुळेही लोकांचा रोष वाढला.
७९ दिवसांचे मंत्री
धनंजय मुंडे यांनी १५ डिसेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. वैद्यकीय कारण देत त्यांनी मंगळवारी राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ केवळ ७९ दिवसांचा राहिला.
गोपीनाथ गडावर बोलले...
१२ डिसेंबर २०२४ रोजी धनंजय मुंडे यांनी अशा घटना इतरत्रही घडल्याचे सांगत ही हत्या कामाच्या व्यवहारातून झाल्याचा दावा केला होता. यात राजकारण करू नये, असे विधान केले होते. यावरूनच सुरेश धस यांनी त्यांना कोंडीत पकडले.
....फोटो व्हायरल
सीआयडीच्या दोषारोपपत्रात काही फोटो, व्हिडीओ जोडले आहेत. हेच फोटो सोमवारी व्हायरल झाले. यामध्ये संतोष देशमुख यांना क्रूरतेने मारताना, हसताना, तोंडावर लघुशंका करतानाचे दिसत आहे. याचे पडसाद उमटताच मुंडे यांनी राजीनामा दिला.
कराडच पाहायचा धनंजय मुंडेंचे काम
धनंजय मुंडे यांचे बीड जिल्ह्यातील सर्व काम वाल्मीक कराड हाच पाहत होता. परळी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीतून हे समोर आले आहे. हे एफआयआर धनंजय देशमुख यांच्या नातेवाइकांनी मंगळवारी माध्यमांना दिले. १८ सप्टेंबर २०२३ रोजी कराडने भागवत गुट्टे यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यात मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाचे सर्व व्यवस्थापन आपण पाहतो, असे लिहिले आहे. तसेच २८ जून २०२४ रोजी कुंडलिक खांडे व शिवराज बांगर यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. यामध्ये त्याने धनंजय मुंडे यांचे जिल्ह्यातील काम आपण पाहत असल्याचे म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध नाही आणि असे तपासात समोर आलेले नाही. मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला आहे. - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट.
मुख्यमंत्र्यांकडे हत्येच्या घटनेचे फोटो आधीच आले होते का? आले असतील तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची कारवाई आधीच का झाली नाही? - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना.
सातपुडा बंगल्यावर आवादा कंपनीचे काही अधिकारी आणि मुंडे, वाल्मीक कराड यांची जी बैठक झाली होती त्याची चौकशी एसआयटीने करावी. - सुरेश धस, आमदार, भाजप.
संतोष देशमुख यांच्या हत्येला ८४ दिवस झाले आहेत. चार्जशीटमधील फोटो हे सरकारने आधीच पाहिलेले असणार. तरीही मुंडे यांचा राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला? - सुप्रिया सुळे, खासदार, शरद पवार गट.
पोलिस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. - हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.
धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे. - अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
अंजली दमानिया, सुरेश धस, संतोष देशमुख यांची लहान मुलगी न्याय हक्कासाठी संघर्ष करत होते. आज सगळ्यांना न्याय मिळाला. - करुणा मुंडे, धनंजय मुंडे यांची पत्नी