वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 20:30 IST2025-01-15T20:29:09+5:302025-01-15T20:30:22+5:30
खंडणीत धनंजय मुंडेचे नाव आहेच, खूनामध्ये मी नाव घेतले नाही. वाल्मीक अण्णाने जे साम्राज्य तयार केले आहे ते मोडले पाहिजे. आका पॅटर्न संपवला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले
मुंबई - धनंजय मुंडे, वाल्मीक कराड नाव असल्याने मी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय घेतला नाही. माझे आणि कराडचे संबंध फार तुटले नव्हते. त्याला हे रोखता आले असते. वाल्मीकमुळे धनंजय मुंडे गेल्या ५ वर्षात बिघडले. वाल्मीकने धनंजय मुंडेंचा पूर्ण विश्वास संपादन केला त्यामुळे वाल्मीक म्हणेल तेच धनंजय मुंडे ऐकायचे. वाल्मीकने धनंजय मुंडेच्या पाठिंब्यानेच हे केले असा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केला. 'लोकमत' व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी धस यांची मुलाखत घेतली त्यात ते बोलत होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या मुलाखतीत सुरेश धस म्हणाले की, मी खंडणीत धनंजय मुंडेंचं नाव घेतो, खूनाच्या प्रकरणात नाही. २८ मे २०२४ नंतर १४ जून, १९ जूनला अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. एसआयटीने चौकशी करावी. माझा कुणी जबाब नोंदवला नाही. मला जर एसआयटीची नोटीस आली तर मी चौकशीला जाईन. जो पोलीस अधिकारी निलंबित झालाय तो सहआरोपी झाला पाहिजे. वाल्मीक कराड डायरेक्ट फोन उचलून मारण्याची, तोडण्याची भाषा वापरतात. त्यामुळे मला नक्कीच माहिती होते, कराडचा फोन झाला असेल. आज ते समोर आले आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय सुदर्शन घुले, प्रतिक घुले, आंधळे, विष्णू चाटे ही जी मुले आहेत ती कराडसोबत असतात. त्यामुळे कराडच्या सांगण्याशिवाय संतोष देशमुखला मारलं जाणार नाही हे मला कळले. जी वस्तूस्थिती मी मस्साजोगमध्ये ऐकली. संतोष देशमुखचा पोस्टमोर्टम रिपोर्ट वाचला तर इतकं बेक्कार त्याला मारले आहे. तो कुठल्याही समाजाचा असता तरी मी पाठपुरावा केला. हा जातीवादाचा विषय नाही. अतिशय अमानवीय पद्धतीने झालेल्या खूनाचा विषय आहे. सिव्हिल सर्जन यांनीही त्याची परिस्थिती सांगितली. इतकं डेंजर मृत्यू असू शकत नाही असं काही डॉक्टरांशी मी बोलल्यानंतर कळले. मी विधानसभेत या घटनेची संपूर्ण माहिती मांडली, तेव्हा पोलीस तपास सुरू झाला नव्हता. मी स्वत: सभागृहात या मारहाणीचे व्हिडिओ चित्रिकरण झाल्याचं बोलले. संतोष देशमुख याला ज्या पद्धतीने मारलं ते पाहता आरोपी सराईत असून त्यांना ड्रग्स दिले असावे त्यातून त्यांनी क्रूरपणे मारलेले आहे. मस्साजोगमधील ३० एकर जमीन अवादा कंपनीने भाड्याने घेतली होती. संतोष देशमुख याने गावातील पोरांना मारले म्हणून गेला. अवादा कंपनीचे सुरक्षारक्षक मस्साजोगचे होते. त्यांना खंडणीसाठी आलेल्या गुंडांनी मारले तेव्हा संतोष देशमुखला सरपंच म्हणून बोलावले तेव्हा ६ डिसेंबरला तिथे वाद झाला होता अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.
दरम्यान, ५-६ दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. काय चाललंय विचारलं तेव्हा माझं संतोष देशमुख एके संतोष देशमुख एवढेच चाललंय सांगितले. वाल्मीक कराडची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. आज जो घटनाक्रम पोलिसांनी कोर्टात सांगितला. ९ डिसेंबरला संतोष देशमुखला धमकीचा फोन वाल्मीकचा आलेला आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, वाल्मीक कराड यांचं संभाषण पुढे सुरू राहिले हे पोलिसांनी सांगितले आहे. तपासात ते समोर आले आहे. ७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आता खंडणीसह १२० ब, मकोका आणि ३०२ या गुन्ह्याखाली वाल्मीक कराड अटकेत आहे. अजून बऱ्याच जणांना मकोका लागायचा आहे. ६ आणि ९ डिसेंबर तारखेपुरते हे प्रकरण मर्यादित नाही. २८ मे २०२४ पासून सगळे तपासावे लागतील. अजूनही बरेच आरोपी बाहेर आहेत असं धस यांनी सांगितले.
आका पॅटर्न संपला पाहिजे
वाल्मीक कराडची या हत्येच्या खटल्यातून सुटका होणार नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये गेले पाहिजे. वाल्मीक कराडच्या खंडणीच्या लालसेपोटीच ही हत्या झाला. कराड वजीर आहे बाकी त्याचे प्यादे आहेत. या हत्या प्रकरणात मुख्य वाल्मीक कराडच आहे. वाल्मीक कराड खूप पुढे निघून गेला. धनंजय मुंडे यांचे सगळे मित्र बाजूला गेलेत फक्त वाल्मीक कराडसोबत, ४०० कोटीचा निधी जिल्हा विकास निधीतून वाल्मीकला दिला गेला. आता लोक हळू हळू पुढे येऊन वाल्मीकविरोधात गुन्हे दाखल करायला लागलेत. डीपीसीसीमध्ये १४ कोटींचे बोगस बिले दिली गेली. बनावट कागदपत्रे वापरून बिल मंजूर करण्यात आली. खंडणीत धनंजय मुंडेचे नाव आहेच, खूनामध्ये मी नाव घेतले नाही. वाल्मीक अण्णाने जे साम्राज्य तयार केले आहे ते मोडले पाहिजे. आका पॅटर्न संपवला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
...म्हणून पंकजा मुंडेंसोबत दुरावा
गोपीनाथ मुंडे राजकारणातील चतुस्त्र व्यक्ती होते. ते सामान्यातून नेते झाले. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे हे ठराविक कार्यकर्ते आणि सोशल मिडिया इतक्या पुरतेच नेते राहिलेत. पंकजा मुंडे लोकसभेपासून दूर गेल्या. मी आदरणाने पंकुताई म्हटलं ते काहींना पटत नाही. विधानसभेला माझ्याविरोधात पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवार उभा केला. धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केला नाही. मराठा समाजाची मते फुटली पाहिजेत त्यासाठी काहींना उभे केले. पंकजा मुंडेंनी आमचे बुथ उघड्या डोळ्यांनी पाहावे. पंकजा मुंडेंना मानणाऱ्या बुथमध्ये २०० मते मला आणि अपक्ष उमेदवाराला ९०० मते गेली असं सांगत पंकजा मुंडे यांच्यासोबत दुरावा का झाला यावर सुरेश धस यांनी भाष्य केले.