धनुभाऊसाठी मिसेस मुंडे प्रचाराच्या रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 03:27 PM2019-07-31T15:27:46+5:302019-07-31T16:49:05+5:30
विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे या सुद्धा मतदारसंघात सक्रिय झाल्या आहे.
संजय खाकरे
मुंबई - राज्यातील राजकीय केंद्रबिंदू म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून रेणापूर आणि परळी विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक राहिले असल्याने मुंडे बहीण-भावाने आपल्या मतदारसंघात भेटीगाठी सुरु केल्या आहे. त्यातच आता विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे या सुद्धा मतदारसंघात सक्रिय झाल्या आहे. मतदारसंघातील कार्यक्रम आणि महिलांच्या बैठकीला त्या हजेरी लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर मिसेस 'मुंडे' प्रचाराच्या रिंगणात उतरल्या असल्याची चर्चा परळी मतदारसंघात सुरु आहे.
राजश्री मुंडे ह्या धनंजय मुंडेच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी परळी शहरातील कार्यक्रमात बाजीराव धर्मअधिकारी यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या एका बैठकीत महिलांशी संवाद साधला. त्याच बरोबर संत श्रेष्ठ सावता महाराज समाधी सोहळ्या निमित्त सुरु असलेल्या सप्ताह सोहळ्यात त्यांनी सहभाग नोंदवत, राम नामाची महती सांगणारे भजन गायले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच मिसेस 'मुंडे' प्रचाराच्या रिंगणात उतरल्या असल्याचे बोलले जात आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्व राज्याचे लक्ष लागलेले असते. त्यामुळे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत समजली जाते. गेल्यावेळी मुंडे बहीण-भावाची ही लढत चांगलीच गाजली होती. पंकजा यांना ९६ हजार ९०४ तर धनंजय मुंडे यांना ७१ हजार ०९ मतदान झाले होते. त्यामुळे पंकजा यांनी २५ हजार ८९५ आघाडी मिळवत विजय प्राप्त केला होता. मात्र या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. त्यामुळे ही लढत पुन्हा लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.