सरकार दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप
By admin | Published: March 8, 2016 04:47 PM2016-03-08T16:47:58+5:302016-03-08T16:47:58+5:30
शेतक-यांच्या तोंडाला सरकारने वर्षभर पाने पुसली आहेत. 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असताना अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. सरकार दुष्काळ दाबण्याचे काम करत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ८ - सर्व आघाडयांवर अपयशी ठरलेल्या सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. जनतेला प्यायला पाणी नाही, जे साधे पाणीही देऊ शकत नाहीत अशा सरकारच्या चहापानाला कशाला जायचे ? म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.
बुधवारपासून सुरु होणा-या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे गटनेते यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका करण्यात आली. शेतक-यांच्या तोंडाला सरकारने वर्षभर पाने पुसली आहेत. 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असताना अजूनही दुष्काळ जाहीर केला नाही. सरकार दुष्काळ दाबण्याचे काम करत आहे. बाकी राज्यात चांगला पाऊस पडूनही दुष्काळ जाहीर झाला, राज्यात का होत नाही असा सवाल धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान विचारला आहे.
मंत्र्यानी मराठवाड्याचे दुष्काळी पर्यटन केले; जगलरी शब्दाचा खेळ करणारे हे सरकार आहे. मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना दिलेले 500 कोटी रु पूर्वीच्याच जाहीर 2 हजार कोटी पैकी आहेत, यात नवीन काही नाही. कापसाचा पीक विमा आणि अनुदानाबाबत हि दळभद्री निर्णय घेतले जात आहेत. 4 महिन्यांपासून चारा छावण्यांची बिले दिले नाहीत. 50 कोटींनी काही होणार नाही. बीड, लातूरमध्येच 60 कोटी पेक्षा जास्त देणे आहे असं धनंजय मुंडे बोलले आहेत.
राज्यात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. राजकीय पक्षांची गुंडगिरी दिसत आहे. पोलिसच सुरक्षित नाही आहेत. डान्स बार बंदीबाबत खायचे अन दाखवायचे दात वेगळे आहेत. बार मालक आणि सरकार यांच्यात मिलिभगत आहे. पहिल्याच आठवड्यात डान्सबार बंदीचा कायदा आणून दाखवा असं आव्हान धनंजय मुंडेंनी केलं आहे.
मुंबई महापालिकेतील मागील 10 वर्षातील कामाचे कॅग मार्फत विशेषलेखापरीक्षण करा. मेक इन इंडिया म्हणजे भुलभूलय्या आहे. गुंतवणुकीचे दावे खोटे आहेत, औद्यागिक घसरण झाली. किती गुंतवणुक आली याची श्वेतपत्रिका काढावी. राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण खोळंबत ठेवले आहेत. मंत्र्याचे घोटाळे मुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातले, शेतक-यांना पीए मार्फत मारहाण करणा-या शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.