भगवानगडावर धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेकीचा प्रयत्न
By admin | Published: January 5, 2015 01:31 PM2015-01-05T13:31:13+5:302015-01-05T13:38:13+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर सोमवारी सकाळी भगवानगड येथे दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला.
Next
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. ५ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाडीवर सोमवारी सकाळी भगवानगड येथे दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. तणावपूर्ण वातावरणामुळे धनंजय मुंडे भगवानगडावरील समाधी स्थळाचे दर्शन न घेताच माघारी परतले.
भगवानबाबा यांच्या समाधीला ५० वर्ष पूर्ण झाले असून यानिमित्त सध्या भगवानगडावर सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी सकाळी धनंजय मुंडे हे भगवानगडावर दाखल झाले. धनंजय मुंडे यांना बघताच पंकजा मुंडे समर्थक चिडले व त्यांनी धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेकीचा प्रयत्न केला. तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या जयजयकार करत धनंजय मुंडे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजीही केली. भगवानगडाचे महाराज नामदेव शास्त्री यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र जमाव शांत होत नव्हता. जमावाने भगवानगडाचे मुख्य प्रवेशद्वारही बंद केल्याचे वृत्त आहे. पंकजा मुंडे यांनीदेखील समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले.
अखेरीस तणावपूर्व वातावरणामुळे धनंजय मुंडे यांना गडावरुन दर्शन न घेताच माघारी परतावे लागले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली असून हा प्रकार दुर्दैवी आहे. पण याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करणार नाही अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे.