धनगर समाजाचे आंदोलन पेटले

By admin | Published: July 28, 2014 03:57 AM2014-07-28T03:57:26+5:302014-07-28T03:57:26+5:30

या समाजातील युवक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बारामती बंद करण्यासाठी शहरातून फेरी काढली

Dhangar community movement agitated | धनगर समाजाचे आंदोलन पेटले

धनगर समाजाचे आंदोलन पेटले

Next

बारामती : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मुद्यावर शनिवारी राज्य सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने यासंदर्भात सुरू असलेले आंदोलन रविवारी पेटले. या समाजातील युवक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी बारामती बंद करण्यासाठी शहरातून फेरी काढली. काही ठिकाणी दगडफेकही केली. जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने २४ युवकांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या अंतर्गत आरक्षण मिळावे या मागणीसाठी १६ जणांनी २१ जुलैपासून बारामती शहरात उपोषण आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत कार्यकर्त्यांची शनिवारी रात्री मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. मात्र, ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे धनगर समाजातील शेकडो युवक बारामतीत रविवारी दाखल झाले. कोणत्याही नेत्यांना न जुमानता त्यांनी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या सुमो गाडीची काच फुटली. युवा वर्गाने बारामती शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने २४ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उपोषण आंदोलनाच्या ठिकाणी येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली. पुणे ग्रामीणसह कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, येथील ३७५ पोलीस कर्मचाऱ्यांचा शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला. काही अनुचित प्रकार वगळता नंतर वातावरण शांत झाले. दिवसभर तणावाचे वातावरण होते. नेमकी राज्य सरकारबरोबर चर्चा काय झाली, अशी विचारणा राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. सरकारने वेळ काढूपणा केल्यामुळे उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना होती. (प्रतिनिधी)

Web Title: Dhangar community movement agitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.