धनगर समाजाचा विधान भवनावर हल्लाबोल!
By admin | Published: March 16, 2017 04:07 AM2017-03-16T04:07:41+5:302017-03-16T04:07:41+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण मिळावे, म्हणून धनगर समाज आरक्षण समिती आणि यशवंत क्रांती मोर्चा या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी
मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) आरक्षण मिळावे, म्हणून धनगर समाज आरक्षण समिती आणि यशवंत क्रांती मोर्चा या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विधान भवनात शिरण्याचा प्रयत्न केला. क्रिकेटर्सच्या वेशात आलेल्या कार्यकर्त्यांनी अचानक आरक्षण देण्याची घोषणाबाजी करत प्लेकार्ड भिरकावले. या प्रकरणी मरिन लाइन्स पोलिसांनी समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्यासह ९ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून, त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
याबाबत आंदोलनाचे मुख्य संयोजक हेमंत पाटील म्हणाले की, ‘धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकीत मते मिळवणारे सरकार आता आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देत आहे. एवढेच नाही, तर धनगर आरक्षणाचा आवाजही दाबला जात आहे. आधी धनगर समाजाच्या नेत्यांना मंत्रिपदे देऊन सरकारने आंदोलनात फूट पाडली. आता आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.’
दरम्यान, पोलिसांना चकवा देण्यासाठी क्रिकेटर्सचे कपडे घालत आंदोलन करणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. धनगर समाज आरक्षणावर टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस) या संस्थेची केलेली नेमणूक त्वरित रद्द करावी आणि धनगर समाजाच्या विकासासाठी आर्थिक बजेट ४ कोटी तातडीने मंजूर करावे, या समितीच्या प्रमुख मागण्या आहेत. कार्यकर्त्यांना गेटवर अडवणाऱ्या पोलीस व धनगर समाज बांधवांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर, आंदोलनकर्त्यांना मरिन लाइन्स पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. सायंकाळी सर्व कार्यकर्त्यांची जातमुचलक्यावर सुटका झाली.(प्रतिनिधी)