राज्यभरात धनगर समाज आक्रमक अन् गोपीचंद पडळकरांच्या एका ट्विटनं चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 01:31 PM2023-09-20T13:31:35+5:302023-09-20T13:33:27+5:30

धनगर समाजाच्या वतीने खंबाटकी घाट व महाराष्ट्रातील २५ विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

Dhangar Samaj is aggressive across the state and Gopichand Padalkar tweet on Dhangar reservation | राज्यभरात धनगर समाज आक्रमक अन् गोपीचंद पडळकरांच्या एका ट्विटनं चर्चांना उधाण

राज्यभरात धनगर समाज आक्रमक अन् गोपीचंद पडळकरांच्या एका ट्विटनं चर्चांना उधाण

googlenewsNext

मुंबई – चोंडी येथे धनगर समाजातील कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाचा चौदावा दिवस उजाडला तरीही सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात नसल्याने आता धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजानंतर धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात २५ ठिकाणी तसेच खंबाटकी घाटात रास्ता रोको केला आहे. आता धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की, मी पहिले धनगर नंतर आमदार गोपीचंद पडळकर! नाद करू नका! यळकोट यळकोट, जय मल्हार! तसेच या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात पडळकरांनी राजमाता अहिल्याबाई होळकरांचा झेंडा फडकवत असताना दिसतायेत, त्या व्हिडिओत म्हटलंय की, जिथे गरज पडेल तिथे बाळूमामा झालं पाहिजे आणि वेळ पडलीच तर बापू बिरू व्हायची सुद्धा तयारी असली पाहिजे असं आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी (ता. जामखेड) येथे धनगर कार्यकर्त्यांकडून धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळावे, यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी या उपोषणाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात मार्ग काढू, असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. परंतु, दोन दिवसात सरकारकडून समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज धनगर समाजाच्या वतीने खंबाटकी घाट व महाराष्ट्रातील २५ विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

पडळकरांनी लिहिलं होतं मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

आमचे प्रश्न संवादाने सुटतील ही अपेक्षा आहे, पण दिरंगाईमुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातसुद्धा जाठ आंदोलनासारखे धनगर आंदोलन उभा होईल हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय असा इशारा पडळकरांनी सरकारला दिला होता.

 

Web Title: Dhangar Samaj is aggressive across the state and Gopichand Padalkar tweet on Dhangar reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.