उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने निलंबित
By Admin | Published: April 6, 2017 06:39 PM2017-04-06T18:39:19+5:302017-04-06T20:05:59+5:30
उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा विनोद तावडे यांनी केली आहे.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ एप्रिल - औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये २०१२ मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग ३ पदांवर नियमबाहय व चुकीच्या नियुक्त्या झाल्याचा ठपका ठेवलेले उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांना निलंबित करुन त्यांची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. तसेच, या मराठवाडा विद्यापीठांमधील नियुक्त्यां संदर्भात चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्यासाठी मंत्रालयातील ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाल-ढकल केली अथवा पाठीशी घातले अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी करण्यात येईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये २०१२ मध्ये झालेल्या प्रपाठक, अधिव्याख्याता व वर्ग ३ मधील ५३ पदांवर चुकीच्या पध्दतीने नियम डावलून भरती करण्यात आल्याच्या तक्रारी विविध संघटनांनी केल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने उच्च शिक्षण संचालनालयाने २०१४ मध्ये चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली होती. या समितीने आपला सविस्तर अहवाल शासनास या पूर्वीच सादर करुन या प्रक्रियेतील अधिकाऱ्यांविरुध्द नियमबाहय व चूकीच्या नियुक्त्यांचा ठपका ठेवला होता.