आरक्षणावरून धनगर समाजाची निराशा
By admin | Published: April 8, 2017 01:45 AM2017-04-08T01:45:28+5:302017-04-08T01:45:28+5:30
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने धनगर समाजाची घोर निराशा केली
इंदापूर : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने धनगर समाजाची घोर निराशा केली आहे. त्यामुळे आरक्षणाची तारीख निश्चित करण्यास भाग पाडण्यासाठी धनगर समाज राज्यस्तरीय आंदोलन सुरू करणार आहे, अशी माहिती आमदार राम वडकुते यांनी मंगळवारी रात्री येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
ते म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला सवलतींचा अधिकार दिला आहे. गेल्या ६८ वर्षांपासून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. धनगड व धनगर या शब्दांमधील छपाईतील चुकीमुळे आम्हाला आरक्षण व इतर सवलतींपासून वंचित रहावे लागले आहे. सवलती व आरक्षण मिळावे, यासाठी १०-१५ वर्षांपासून आम्ही आंदोलनात्मकलढा उभा केला आहे.
भाजपाला सत्ता मिळाली, मात्र आश्वासनाचा विसर पडला. नंतर ज्यावेळी आम्ही त्यांना आठवण काढून देऊ त्यावेळी वेळ मारून नेण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले, असे आमदार वडकुते म्हणाले.
धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य डॉ. शशिकांत तरंगे, कृती समितीचे तालुकाध्यक्ष माऊली वाघमोडे, सदस्य भगवान कोळेकर, सोमनाथ नरुटे, विष्णू पाटील, वैभव तरंगे उपस्थित होते.
सन २०१९च्या निवडणुकीची तयारी करायला सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासदार व मंत्र्यांना इथून पुढे आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आधी धनगर आरक्षण मगच निवडणूक, अशी भूमिका धनगर समाजाने घेतली आहे.
आरक्षणाची तारीख त्यांनी जाहीर करावी आणि आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहोत.