विजांचा कडकडाटासह नाशिकमध्ये जोर ‘धार’; संध्याकाळी पाचपासून आठ वाजेपर्यंत १९.३मि.मि पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 08:52 PM2017-10-09T20:52:33+5:302017-10-09T20:53:49+5:30
अवघ्या चार तासांत १९.३मि.मि इतक्या पावसाची नोंद हवामान निरिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८.७ मि.मि इतका पाऊस पडला. दुपारपासून शहराच्या काही उपनगरीय भागांमध्ये काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली.
नाशिक : मान्सूनचा परतीचा प्रवास संथगतीने सुरू असल्यामुळे आॅक्टोबरमध्येही पावसाची ‘जोर’ धार हजेरी पहावयास मिळत आहे. मागील तीन दिवसांपासून शहराच्या वातावरणात कमालीचा बदल झाला असून, दिवसभर उकाडा आणि संध्याकाळपासून पावसाचा तडाखा असाच काहीसा अनुभव नाशिककर घेत आहे. सोमवारी दुपारी पावसाला सुरूवात झाली; मात्र संध्याकाळी पाच वाजेपासून पावसाचा जोर वाढला. रात्री साडेआठ वाजेपर्यंत अवघ्या चार तासांत १९.३मि.मि इतक्या पावसाची नोंद हवामान निरिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ८.७ मि.मि इतका पाऊस पडला.
दुपारपासून शहराच्या काही उपनगरीय भागांमध्ये काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली.
मुंबई नाक्यापासून पुढे शहराच्या मध्यवर्ती भागात संध्याकाळी साडेसहा वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. देवळाली कॅम्प, इंदिरानगर, पाथर्डी, वडाळागाव, आंबेडकरनगर, अशोकामार्ग आदी भागात पावसाने सलामी दिली होती. संध्याकाळी मुंबई नाका, सीबीएस, गंगापूररोड, कॅनडा कॉर्नर, गंगापूररोड, सातपूर, सिडको, पंचवटी, जुने नाशिक आदी परिसराला पावसाने झोडपून काढले. या भागातील रस्ते जलमय झाले होते. पावसाच्या आगमनामुळे विक्रेत्यांसह दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शाळा-महाविद्यालय, कार्यालये सुटण्याच्या वेळेत पावसाने वर्दी दिल्याने विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचे हाल झाले. रविवारी सकाळी साडे आठ वाजेपासून रात्री साडे आठ वाजेपर्यंत १०.३ मि.मि इतका पाऊस झाला होता. रविवारच्या तुलनेत आज दुप्पट पाऊस नाशिकमध्ये झाल्याने सर्वच रस्ते जलमय झाले होते.