गोष्ट धारावीच्या 'काळ्या किल्ल्या'ची...

By Admin | Published: March 23, 2016 05:25 PM2016-03-23T17:25:48+5:302016-03-23T17:36:22+5:30

धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासिक किल्ला आपलं अस्तित्व

Dharavi's Black Fort ... | गोष्ट धारावीच्या 'काळ्या किल्ल्या'ची...

गोष्ट धारावीच्या 'काळ्या किल्ल्या'ची...

googlenewsNext

(भाग एक )

- गणेश साळुंखे
 
धारावी. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी..या आक्राळ विक्राळ पसरलेल्या झोपडपट्टीच्या एका कोपऱ्यात मुंबईच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असणारा एक ऐतिहासिक किल्ला आपलं अस्तित्व टिकवायला धडपडतोय. या किल्ल्याची  बहुसंख्य 'मुंबई  आमची, नाही कोनाच्या बापाची' म्हणणाऱ्यांना खबरही नसेल हे निश्चित..!
इसवी सन १७३७ मध्ये उभारलेल्या या किल्ल्याचं  नांव  'फोर्ट रिवा किंवा रेवा'  असं  असलं  तरी  पूर्वीपासून हा  किल्ला  'काळा किल्ला'  या नांवानेच ओळखला जातो..या इतिहास पुरूषाचं आजचं वय वर्ष २८० मात्र..!!
 
धारावीच्या 'महाराष्ट्र निसर्ग उद्याना'च्या समोर 'बीइएसटी'चे धारावी व काळा किल्ला असे शेजारी शेजारी दोन बस डेपो आहेत..या बस डेपोच्या पूर्वेकडील भितीला अगदीलगटून हा 'काळा किल्ला' उभा आहे..बस डेपोच्या उगवतीच्या दिशेच्या कंपाऊंड  वॉलला  लागून असलेल्या तीन-चार  फुटाच्या  पॅसेजमधून  थेट  या  किल्ल्याकडे  जायला  वाट आहे,  मात्र  हा  पॅसेज  अत्यंत  घाणेरडा  असून  चालणेबल  नाही  आणि  म्हणून  थोडा  लांबचा  वळसा  घेऊन  झोपड्यांच्या  भुलभुलैयासम  गल्ल्यातून, लोकांना  विचारत विचारत या किल्ल्याकडे जावं लागतं..
 
मी व माझे सहकारी श्री. अनिल पाटील नुकतेच हा किल्ला पाहून आलो. हा किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा असून आत प्रवेशकरण्यासाठी याला दरवाजा नाही.आता मुळात दरवाजाच नव्हता की आजुबाजूला पडलेल्या झोपड्यांच्या गराड्यात याचा दरवाजा गायब झाला हे समजण्यास मार्ग नाही..पण किल्ल्यात प्रवेश करायचा झाल्यास  शिडीवरून  अथवा  एके  ठिकाणी  तुटलेल्या  तटबंदीवरून  आंत  प्रवेश  करता  येतो.. अर्थात  आम्ही  तो  प्रयत्न  केला  नाही  कारण  आजुबाजूच्या  रहिवाश्यांची  आम्ही संशयास्पद इसम (पक्षी-सरकारी अधिकारी) आहोत अशी खातरी झाली होती व त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्यांच्या मदतीशिवाय आत जाणे शक्यही नव्हते..
 
असो. किल्ल्याची तटबंदी मुळची अती मजबूत असल्याने अजून शाबूत आहे..तटबंदीच्या दर्शनी भागावर "सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर ऑनरेबल हॉर्न यांनी सन  १७३७  मध्ये  बांधला"  अशी  दगडात  कोरलेली  पाटी  असून  सदर  मजकूराखाली  'इंजिनिअर' म्हणून कोणाची तरी आद्याक्षरे कोरलेली आहेत..पाटीचा फोटो सोबत देतआहे..
 
किल्ल्याची तटबंदी व वरील तोफा रोखण्याच्या जागा अजूनही सुरक्षित आहेत..किल्ल्याच्या आतील भागाचे फोटो काढण्यासाठी आम्ही किल्ल्याला लागून अभ्या असलेल्या  इमारतीच्या  गच्चीवर  गेलो..वरूनही किल्ला झोपड्यांच्या व झाडांच्या गराड्यात हरवून गेला होता. वरून दिसणारा  किल्ल्याचा  बाणाच्या  फाळासारखा  आकार  लक्षात येत होता..हे फोटोही सोबत पाठवत       आहे..या किल्ल्यात एक भुयार असल्याचा उल्लेख bijoor.me या वेबसाईट वर सापडतो परंतु आम्ही आत न गेल्याने ते पाहता आले नाही..
 
इमारतीच्या गच्चीवरून  समोर उत्तरेला मिठी नदीचे पात्र, पश्चिम  दिशेला  काही  अंतरावर  असलेला  माहीमचा  किल्ला  आणि   पूर्वेच्या टेकडीवरचा सायनचा किल्ला अस्पष्टसा दिसत होता..सायन ते माहीमच्या  दरम्यान  मिठी नदी (माहीमची खाडी) पूर्वेकडून  पश्चिमेच्या दिशेने वाहते..एके काळी या मिठी नदीचं पात्र विस्तीर्ण असून ते या काळ्या किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत होतं असं  इतिहासात नोंदलेलं आहे..धारावी बस डेपो, डेपोपलीकडील मोठा रस्ता व निसर्ग उद्यान या सगळ्या आजच्या काळातील गोष्टी  मिठी नदीच्या पात्रात भरणी टाकून केलेल्या आहेत  हे त्या इमारतीच्या गच्चीवरून बघताना सहज लक्षात येत होतं..
 
'काळा  किल्ला' मिठी नदीच्या दक्षिण तिरावर असून माहीमचा किल्ला मिठी  नदी  समुद्रास  जिथे मिळते  त्या  ठिकाणी  आहे  तर  पूर्वेचा सायनचा किल्ला याच मिठी नदीच्या दक्षिण तटावर सायनच्या टेकडीवर उभा आहे..हे तिन्ही किल्ले ‘ब्रिटीश मुंबई’च्या उत्तर सीमेचे खंदे रखवालदार होते..
 
ब्रिटीशांच्या ताब्यात तेंव्हा मिठीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते सायन पर्यंतचा इलाखा होता तर मिठीच्या उत्तर तीरापलीकडील प्रदेश, ‘साष्टी’ इलाखा, म्हणजे वांद्र्यापासून पुढे वसई, दिव, दमण इत्यादी पोर्तूगिजांच्या  ताब्यात  होता.. पोर्तुगीजांनी त्यांच्या ताब्यातील भूभागाचे सागरी शत्रूंपासून रक्षण व्हावे या हेतूने वांद्र्याच्या समुद्र किनाऱ्यावर (आताच्या ‘ताज लॅण्ड्स एंड’ किंवा ‘हॉटेल सी रॉक’ येथे) बांधलेला ‘केस्टेला डी अग्वादा’ अगदी आजही बघता येतो.
 
या लेखाचा विषय असलेला ‘काळा किल्ला’ ब्रिटीशांनी इसवी सन १७३७ मध्ये बांधला हे आपण सुरुवातीस पहिले. सन १७३७ मध्ये पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी इलाखा छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ यांनी काबीज केला आणि मराठ्यांच्या आरमारी ताकदीची प्रचंड दहशत मनात बसलेल्या ब्रिटीशांना आपल्या मिठीच्या तीरापर्यंत पसरलेल्या मुंबईचे इलाख्याचे रक्षण करण्यासाठी माहीम व सायन यांच्या मध्यावर एक किल्ला बांधण्याची निकड वाटली आणि त्यातून या किल्ल्याची निर्मिती झाली..एका अर्थाने  ‘काळा किल्ला’ मराठ्यांच्या ताकदीचा ब्रिटीशांनी घेतलेल्या धसक्याचे  प्रतिक आहे असे म्हटले तर चुकणार नाही..
 
जाता जाता –
‘काळा किल्ला’ जरी भौगोलिक दृष्टीने धारावीत असला तरी ‘धारावी किल्ला’ या नावाचा किल्ला हा चक्क ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथे असल्याचा उल्लेख सापडतो. या ठिकाणी ‘धारावी देवी’ असल्याचाही उल्लेख आहे. मुंबईतील धारावी व भाईंदर येथील ‘धारावी’ याचा काय संबंध असावा किंवा मुंबईतल्या धारावीचे, ‘धारावी’ व किल्ल्याचे ‘रीवा फोर्ट’ अशी नांवे कशी पडली असावीत, या संबंधी एक तर्क पुढील भाग दोन मध्ये..!
 
 

Web Title: Dharavi's Black Fort ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.