धर्मा पाटील मृत्यू प्रकरण- सरकारने नरेंद्र पाटील यांना दिलं लेखी आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 01:49 PM2018-01-29T13:49:02+5:302018-01-29T13:51:02+5:30
राज्य सरकारने धर्मा पाटील यांच्या मुलाला लेखी आश्वासन दिलं आहे.
मुंबई- संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात विष प्राशन केलेले 84 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं. जोपर्यंत योग्य मोबदल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही, आणि धर्मा पाटील यांना शहीद शेतकरी घोषित करत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी मुंबईतील जे जे रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारने धर्मा पाटील यांच्या मुलाला लेखी आश्वासन दिलं आहे. जमिनीचं फेरमूल्यांकन करुन पंचनाम्यानुसार जो मोबदला येईल तो व्याजासह 30 दिवसात देऊ, असं सरकारच्यावतीने म्हटलं आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचं पत्र धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र यांना दिलं.
धर्मा पाटील यांच्या मुलानं हॉस्पिटलच्या आवारातच आंदोलन सुरु केलं असून त्यांची भेट घेण्यासाठी काही वेळापूर्वीच मंत्री जयकुमार रावल आणि गिरीश महाजन जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते.
विखरणमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको
सरकारच्या अनास्थेमुळे धर्मा पाटलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शेतकरी एकवटले आहेत. धर्मा पाटलांच्या गावातील शेतकऱ्यांना रास्ता रोको करुन सरकारचा निषेध सुरु केला.