‘संथारा’ समर्थनार्थ धर्म बचाव आंदोलन
By admin | Published: August 25, 2015 05:42 AM2015-08-25T05:42:20+5:302015-08-25T05:42:20+5:30
‘संथारा’ व्रत बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जैन समाजाने सोमवारी राजधानी नवी दिल्लीसह देशाच्या अनेक भागांत तसेच
नवी दिल्ली/मुंबई : ‘संथारा’ व्रत बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जैन समाजाने सोमवारी राजधानी नवी दिल्लीसह देशाच्या अनेक भागांत तसेच महाराष्ट्रभरात मूक मोर्चे काढून आणि बंद पाळून जैन धर्माच्या या परंपरेचे समर्थन केले. अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी नवी दिल्ली येथे संथाराच्या समर्थनार्थ देशव्यापी ‘धर्म बचाव आंदोलना’चा शंखनाद केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचा प्रतिध्वनी उमटला.
भारतीय संविधानात सर्व नागरिकांना पूजा, अर्चना आणि साधना करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे, असे विविध धर्मांच्या नेत्यांनी म्हटले आहे. संथाराच्या समर्थनार्थ जैन समाजातर्फे सोमवारी नवी दिल्लीत एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विविध धर्मांच्या नेत्यांनी भाग घेतला. राजस्थान उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी संथारा ही आत्महत्या असल्याचे सांगून त्यावर प्रतिबंध घातला आहे.
विदर्भात शांतीमोर्चा
विदर्भात ठिकठिकाणी शांती मोर्चा काढण्यात आला. सर्वधर्मीयांनी त्यास समर्थन दिले. नागपूरमध्ये मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. विजय दर्डा, खा. अजय संचेती उपस्थित होते. जैन संत पूर्णचंद्र सूरीश्वरजी महाराज, दिगंबर संत मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज, गिरनारसागरजी महाराज, पीयूष सागरजी महाराज, रविपद्मनंदीजी महाराज, जैन साध्वी प्रफुल्लाजी आदींनी मार्गदर्शन केले.
अमरावती, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला. पुसद येथे २५ जणांनी मुंडण करून संथारा बंदीचा निषेध नोंदविला.
औरंगाबादमध्ये धर्मसभा
औरंगाबादमध्ये सर्व पंथांतील साधू-साध्वीजी तसेच समाजबांधवांनी एकत्र येऊन शांतीपूर्ण मार्गाने निषेध व्यक्त केला. जैन बांधवांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर निघालेल्या मूक मोर्चाचे धर्मसभेत रूपांतर झाले. प.पू. विशालमुनिजी
म. सा. यांनी मार्गदर्शन केले. जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड जिल्ह्यात समाजबांधवांनी मूक मोर्चे काढून प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सोलापूरमध्ये व्यवहार बंद
सोलापूर जिल्ह्यात जैन बांधवांनी व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चा काढला. मोडनिंबमध्ये मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते.
नाशिकमध्ये बाजार समित्या बंद
नाशिक जिल्ह्यात लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी शहरातील आंदोलनाचे नेतृत्व केले.
अकोल्यात कडकडीत बंद
जैन समाजातर्फे अकोला जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चेही काढले.
कोल्हापूरमध्ये सह्यांची मोहीम
कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी शांततापूर्ण मार्गाने धर्म बचाव आंदोलन झाले. जयसिंगपूरमध्ये एक लाख सह्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
नगरमध्येही बंद
सकल जैन समाजाने सोमवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जैन बांधवांनी दुकाने बंद ठेवली होती. जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
खान्देशात निषेध
खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जामनेरमध्ये जैन साध्वींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
अध्यादेश काढण्याची मागणी
‘संथारा’ची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी केंद्राने वरिष्ठ वकिलामार्फत आणि जैन संतांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. परंपरा कायम ठेवण्यासाठी अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, अशी मागणी पुण्यात सकल जैन समाजातर्फे करण्यात आली. पंतप्रधान, मुख्यमंत्री व केंद्रीय अल्पसंख्याकमंत्र्यांसाठीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांना देण्यात आले.