"'धर्मवीर' सिनेमा हा व्यावसायिक; आनंद दिघे केवळ ३-४ लोकांमध्ये वावरले नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:31 PM2022-08-17T18:31:08+5:302022-08-17T18:32:14+5:30
शिवसेनेबाबत माझ्या मनात लहानपणापासून आस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून शिवसेना सांभाळली आहे असं केदार दिघेंनी सांगितले.
शिर्डी - धर्मवीर सिनेमा हा व्यावसायिक आहे. आनंद दिघे हे केवळ ३-४ लोकांमध्ये वावरले नाहीत. दिघेंचे चाहते महाराष्ट्रात आहेत. अनेक जणांच्या आयुष्यात दिघेंमुळे आमुलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे ३ तासाच्या सिनेमात हे त्यांचा जीवनपट बसू शकत नाही. आनंद दिघेंवर वेबसिरीज करावी लागेल. ज्यांनी साहेबांसोबत काम केले त्यांना घेऊन जीवनपट तयार करायला हवा असं सांगत शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
केदार दिघे म्हणाले की, शिवसेना संघटनेत मला जिल्हाप्रमुखपदाची संधी दिली. जी जबाबदारी उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे दिली. त्यातून लोकांना न्याय देण्याचा, दिवसरात्र सेवा करण्यासाठी मला बळ मिळावं ही माझी प्रार्थना आहे. मी दिघेंचा पुतण्या आहे. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा यावी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे पुन्हा यावेत यासाठी साईबाबांकडे प्रार्थना केली असं त्यांनी म्हटलं.
तसेच कुठलेही भवन शिंदे गटाने उभे केले तरी देव देवाऱ्यात राहिल्याशिवाय देवाला महत्त्व नाही. शिवसेना भवनाची विट बाळासाहेबांनी रचली आहे. आज बाळासाहेबांमुळे शिवसेना भवनात लोक आस्थेने येतात. त्यामुळे कुठल्याही नावाने तुम्ही भवन उभे केले तरी शिवसेना भवन आणि मातोश्रीचे महत्त्व तसेच राहणार आहे असंही केदार दिघेंनी म्हटलं.
दरम्यान, शिवसेनेबाबत माझ्या मनात लहानपणापासून आस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबप्रमुख म्हणून शिवसेना सांभाळली आहे. शिवसेना प्रत्येक शिवसैनिकांची आहे ज्यांनी बाळासाहेबांचे विचार जपले आहेत. उद्धव ठाकरेंवर प्रचंड विश्वास ठेऊन शिवसेना पुढे जाईल. शिवसेना जिथे आहे तिथेच आहे. शिवसेना संघर्षातून घडली आहे. त्यामुळे संघर्ष नवीन नाही. व्यासपीठावरून ४-१० गेले तरी व्यासपीठासमोरील ४० लाख, ४ कोटी जनता शिवसेनेसोबत आहे. आनंद दिघेंनी शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठा जपली. हे ज्यांनी अनुभवले ते शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहतील. आनंद दिघेंनी ज्याप्रकारे कार्य केले ते माझ्या हातातूनही घडेल असा विश्वास केदार दिघेंनी व्यक्त केला.