शेवटचे चार दिवस धुमधडाका
By admin | Published: August 29, 2014 03:12 AM2014-08-29T03:12:47+5:302014-08-29T03:12:47+5:30
गणेशोत्सवातील शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी मिळाल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे
औरंगाबाद : गणेशोत्सवातील शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी मिळाल्याने गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. अशी परवानगी देत असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केल्याने औरंगाबाद खंडपीठाच्या न्या़ आर. एम. बोर्डे आणि न्या़ व्ही. के. जाधव यांनी यासंदर्भातील याचिका निकाली काढली.
वर्षभरात १५ वेगवेगळ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्यात येते. यात तीन दिवस कोणते हे ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. गणेशोत्सवात गौरी विसर्जन, गणेश चतुर्थी आणि गणेश विसर्जनाचा दिवस, असे एकूण तीन दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्यात येते. गणेशोत्सवात शेवटचे सलग चार दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन विनोद पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना दिले होते. या निवेदनावर कोणताही निर्णय न घेतल्यामुळे त्यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. अशीच मागणी करणाऱ्या जनहित याचिकेत २०११ मध्ये खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे आदेशित केले होते. मात्र, त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही, अशी माहिती याचिकाकर्त्याने २६ आॅगस्ट रोजी सुनावणीवेळी न्यायालयाला दिली होती.