धुळे - ४०० गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण?

By admin | Published: August 22, 2016 07:46 PM2016-08-22T19:46:49+5:302016-08-22T19:46:49+5:30

शहरातील मनपा मालकीच्या ३९ व्यापारी संकुलातील एकूण ८८५ गाळ्यांपैकी जवळपास निम्म्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण झाल्याची शक्यता मनपा सूत्रांनी वर्तविली आहे़

Dhule - 400 mills interconnected? | धुळे - ४०० गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण?

धुळे - ४०० गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण?

Next

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २२  : शहरातील मनपा मालकीच्या ३९ व्यापारी संकुलातील एकूण ८८५ गाळ्यांपैकी जवळपास निम्म्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण झाल्याची शक्यता मनपा सूत्रांनी वर्तविली आहे़ तर दुसरीकडे गाळ्यांचे भाडे, हस्तांतरण फीकडेही दुर्लक्ष झाल्याने मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे, एवढेच नव्हे तर बाजार शुल्क वसुलीदेखील गेल्या वर्षभरापासून रखडली आहे़. 


विनापरवानगी हस्तांतरण
मनपाने १३ जानेवारी २०१६ ला झालेल्या महासभेत गाळे हस्तांतरण फीमध्ये पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. तसा ठरावही करण्यात आला़ मात्र मनपाच्या एकूण गाळ्यांपैकी जवळपास निम्म्या गाळ्यांचे परस्पर हस्तांतरण होऊनही मनपाकडे हस्तांतरणासाठी एकही प्रस्ताव आलेला नाही़ प्रस्तावच आलेले नसल्याने उत्पन्नही मिळालेले नाही़ त्यामुळे मनपाच्या गाळ्यांचे सर्रास हस्तांतरण केले जात असूनही मनपा प्रशासन अंधारात आहे़ शिवाय कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणीदेखील सोडले जात आहे़.


पाचपट होते आकारणी
मनपाने महासभेच्या ठरावानुसार रेडिरेकनर दरानुसार गाळ्यांची भाडे आकारणी सुरू केली आहे़ नवीन दरानुसार गाळेधारकांना भाडे आकारणी करून बिले वितरित करण्यात आली आहेत़ पूर्वी ९०० ते ७२०० पर्यंत असलेले दुकान भाडे रेडिरेकनर दरामुळे थेट २० हजार ७० हजारांवर पोहचले आहे़ एवढे भाडे असताना मनपा प्रशासन गाळा हस्तांतरासाठी दुकानाच्या वार्षिक भाड्याच्या पाचपट रक्कम आकारणी करत असल्याने कुणीही मनपाकडे हस्तांतरणाची परवानगी घेण्यासाठी धजावत नाही़ काही गाळेधारकांनी हस्तांतरणासाठी परवानगी घेण्याचा प्रयत्नही केला; मात्र मनपाची हस्तांतरण फी आकारणी पाहून त्यांनीही माघार घेतली आहे़.

करार संपले, दुप्पट आकारणी!
मनपाने करारावर दिलेल्या गाळ्यांपैकी ज्या गाळ्यांची मुदत संपली आहे, त्यांना दुप्पट कर आकारणी केली जाते़ पाचकंदील मार्केट परिसरातील बहुतांश गाळ्यांचे करार संपले असल्याने त्यांना वार्षिक दुकान भाडेदेखील दुप्पट आकारले जाते़ जवळपास १०४ गाळेधारकांना दुप्पट आकारणी केली जाते़ पाचकंदील मार्केटमधील बहुतांश गाळे मूळ मालकांनी हस्तांतरित केले आहेत़ तर अनेक मूळ मालक मृत होऊन बरेच वर्ष उलटल्यानंतरही मनपाकडून मूळ मालकांच्याच नावे आकारणी केली जाते़

अशीही एक समस्या!
मनपाकडून ज्या मूळ मालकांनी गाळे घेतले, त्यांनी परस्पर त्या गाळ्यांचे हस्तांतरण केले. मात्र मनपा वसुली विभागाने मालमत्ता करवसुली करताना ज्याने हस्तांतरणातून दुकान घेतले, त्याच्या नावानेच वसुली केली आहे. त्यामुळे चक्क मूळ मालकांचेच नाव बदलले असल्याचीही दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे़ प्रचंड घोळ असलेल्या या विषयात लक्ष घातल्यास मनपाला दरवर्षी पाच कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळू शकते़

कारवाईचे ‘राजकारण’
पाचकंदील मार्केटप्रश्नी मनपा प्रशासनाने कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता त्या विषयाचे राजकारण करण्यात आले़ या ठिकाणी प्रत्येक विषयात राजकारण केले जात असल्याने काही विषय न काढलेलेच बरे, अशी भूमिका अखेर आयुक्त घेताना दिसतात़ मात्र हे सर्व प्रकार थांबविण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे़ शिवाय मनपाचे नुकसान होत असल्याने त्याचा सर्वसामान्य जनतेलाही अप्रत्यक्षपणे फटका बसत आहे़ त्यामुळे मनपाने सर्वांना विश्वासात घेऊन हे विषय हाताळणे आवश्यक असून ठोस कारवाई गरजेची आहे़

Web Title: Dhule - 400 mills interconnected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.