धुळे - शहर हद्दवाढीबाबत संभ्रम कायम!
By admin | Published: August 21, 2016 06:43 PM2016-08-21T18:43:59+5:302016-08-21T18:43:59+5:30
महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित केलेली शहर हद्दवाढ अजूनही होण्यास तयार नसून प्रस्तावाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे़
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २१ : महापालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रस्तावित केलेली शहर हद्दवाढ अजूनही होण्यास तयार नसून प्रस्तावाबाबतच साशंकता निर्माण झाली आहे़ तर दुसरीकडे आमदार अनिल गोटे यांनी नवीन प्रस्ताव कधीच शासनाला सादर करण्यात आला असून शहर हद्दवाढीची घोषणा कधीही अचानकपणे केली जाऊ शकते, असे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले़.
महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शहर हद्दवाढीची प्रक्रिया दोन वर्षापूर्वी सुरू केली होती़ तत्पूर्वी प्रक्रिया संथगतीने सुरू होती मात्र दोन वर्षांपूर्वी शहर हद्दवाढीच्या हालचाली गतीमान झाल्या होत्या़ मनपाचे तत्कालिन प्रभारी आयुक्त के़व्ही़धनाड यांच्या कार्यकाळात हद्दवाढीचा प्रस्ताव अजेंड्यावर आला़ हद्दवाढीच्या प्रस्तावात सुचविण्यात आलेली पाचपटीपेक्षा अधिक वाढ पाहून तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ देखील अवाक् झाले होते़ त्यानंतर चारवेळा बदल करून अंतिम प्रस्ताव तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अभिप्रायासह शासनाला सादर करण्यात आला होता़.
जिल्हाधिकारी मिसाळ यांनी पालिकेची परिस्थिती डोळयासमोर ठेवून केवळ चारच गावे हद्दवाढीत घेणे योग्य होईल, असा अभिप्राय दिला होता़ त्यानंतर आमदार अनिल गोटे यांच्या पत्रामुळे मुख्यमंत्र्यांकडे फेब्रुवारी महिन्यात बैठक झाली व त्या बैठकीत प्रस्तावित क्षेत्र वाढविण्याची मागणी आमदार गोटेंनी केली़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी क्षेत्र वाढवून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते़ मात्र त्यानंतर नवीन प्रस्तावाच्या गटांगळया सुरू आहेत़
संभ्रमावस्था कायम!
मनपा प्रशासनाने प्रस्तावित १६ पैकी १५ गावे कायम ठेवली असून त्यात लळींग गाव वगळण्यात आले आहे तर सावळदे गावाचा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ नवीन नकाशे तयार करून मनपा प्रशासनाने ते जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केल्याची माहिती दिली असली तरी या बाबत दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही प्रस्ताव शासनाकडे गेला किंवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही़ तत्कालिन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी बदल झालेला प्रस्ताव आपण असेपर्यंत तरी शासनाला पाठविण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले तर नवनियुक्त जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी माहिती घेऊन सांगणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले़ तर आमदार अनिल गोटे यांनी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर झाला असून त्यातील आवश्यक ते बदल देखील करण्यात आले आहेत़ आता कोणत्याही क्षणी शहर हद्दवाढीची अचानक घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती दिली़ त्यामुळे नेमकी स्थिती काय हा प्रश्न निर्माण झाला आहे़