देशभर घुमला धुळ्याचा आवाज
By admin | Published: August 10, 2015 12:45 AM2015-08-10T00:45:00+5:302015-08-10T00:45:00+5:30
सलग १८ तास ३३ मिनिटे गायन करून २२२ मराठी, हिंदी गीते सादर करणाऱ्या गायत्री व पारिजात चव्हाण यांनी धुळ्याचे नाव देशभर पोहोचविण्याचे काम केले आहे.
अनिल मकर, धुळे
सलग १८ तास ३३ मिनिटे गायन करून २२२ मराठी, हिंदी गीते सादर करणाऱ्या गायत्री व पारिजात चव्हाण यांनी धुळ्याचे नाव देशभर पोहोचविण्याचे काम केले आहे. त्याची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने घेतली आहे. शास्त्रीय संगीताची कुठलीही पदवी न घेता त्यांनी केलेले धाडस धुळेकरांसाठी गौरवास्पद आहे.
सोलो (वैयक्तिक) गायनाच्या १२ तासांच्या विक्रमाची यापूर्वी नोंद आहे. चव्हाण दाम्पत्याने हा विक्रम मोडीत काढला. दर तासानंतर पाच मिनिटे ब्रेक आणि थोडेसे गरम पाणी किंवा चहा एवढ्यावरच त्यांनी कलेवरील श्रद्धेच्या जोरावर हे आव्हान लिलया पेलले. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डोक्यात गाणंच असतं. २०१३ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गीतगायनाचा एक कार्यक्रम केला होता. भारतीय चित्रपटातील गीतांनी देशवासीयांना देशभक्ती, नाती, प्रेम असं बरंच काही दिलं, असे पारिजात यांनी सांगितले.
चव्हाण दाम्पत्याला घरातूनच कलेचं बाळकडू मिळालं. पारिजात यांचे वडील श्यामा चव्हाण गुरुजी संगीत नाटक बसवायचे. त्यांनी जिल्ह्यात एक सांस्कृतिक चळवळ निर्माण केली होती. तसेच त्यांचे काकाही कीर्तन, प्रवचन करीत असल्याने त्यांनाही गायनाची आवड होती. चव्हाण यांना घरातूनच गायनाचा वारसा मिळाला.
गायत्री यांच्या आई-वडिलांनाही गायनाची आवड असल्यामुळे त्यांनाही घरातूनच वारसा मिळाला. वडील अनिल मुळे यांचा त्यांच्या यशात मोठा वाटा आहे.