जळगावमधील तांबापुरात दोन गटात धुमश्चक्री
By admin | Published: July 24, 2016 12:59 AM2016-07-24T00:59:54+5:302016-07-24T01:04:21+5:30
क्षुल्लक कारणावरुन तांबापुरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता दोन गटात जोरदार वाद झाला. त्यात एका गटाकडून तलवारी काढण्यात आल्या; तर प्रतिस्पर्धी गटाकडून
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - क्षुल्लक कारणावरुन तांबापुरात शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता दोन गटात जोरदार वाद झाला. त्यात एका गटाकडून तलवारी काढण्यात आल्या; तर प्रतिस्पर्धी गटाकडून प्रत्युत्तर म्हणून विटांचा मारा करण्यात आला. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी दोन्ही गटाच्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून अन्य संशयितांची रात्रभर धरपकड सुरु होती.
लहान मुलांच्या भांडणावरुन वाद उफाळला
शिरसोली नाक्याला लागून असलेल्या तांबापुरात शुक्रवारी संध्याकाळी बावरी व गवळी गटात लहान मुलांच्या भांडणावरुन वाद झाला होता. हा वाद शनिवारी रात्री पुन्हा उफाळून आला. समाधान हटकर (गवळी) याला मारण्यासाठी बावरी गटाकडून दहा ते बारा जण धावून आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गवळी गटाचेही दहा ते बारा जण धावून आले. बावरी गटाने तलवारी काढून गवळी गटावर चाल केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून गवळी गटाने विटा व दगडांचा मारा सुरु केला. त्यामुळे तांबरापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांवर दगडफेक
तांबापुरात दोन गटात वाद झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी कर्मचारी रवाना केले. तर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनीही कमांडो पथक रवाना केले, त्यामुळे संशयितांची पळापळ झाली. धरपकड मोहीमेत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. सहायफ फौजदार रत्नाकर झांबरे, शरद भालेराव, अशरफ शेख, गोविंदा पाटील, परेश जाधव, विजय पाटील आदी कर्मचाऱ्यांच्या दिशेनेही दगडफेक झाली. मात्र त्यापासून त्यांनी बचाव केला. यावेळी एका चारचाकीचे नुकसान झाले आहे.
सहा जण ताब्यात
निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक समाधान पाटील, विजय आढाव, उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी आदींनी घरात घुसून संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त होता. रामानंद नगर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात परिस्थिती नियंत्रणात आली.ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये समाधान हटकर,रामा हटकर,योगेश राठोड, सतपालसिंग बावरी, कमलसिंग बावरी व बजनसिंग बावरी यांचा समावेश आहे.