मधुमेह दिन विशेष : दडपणामुळे तरुणाई लपवतेय आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:20 AM2018-11-14T02:20:35+5:302018-11-14T02:20:56+5:30
ऐन पंचविशीतील तरुण मुले-मुली अचानक मधुमेहाचे निदान झाल्यामुळे, सामाजिक दबावाखाली येऊन मधुमेह असल्याचे
स्नेहा मोरे
मुंबई : ऐन पंचविशीतील तरुण मुले-मुली अचानक मधुमेहाचे निदान झाल्यामुळे, सामाजिक दबावाखाली येऊन मधुमेह असल्याचे लपवितात. मुंबईसारख्या मेट्रो शहरात हे प्रमाण अधिक असून, सध्या अशा प्रकारचे अनेक रुग्ण दिसून येत असल्याचे मधुमेहतज्ज्ञांनी निरीक्षण केले आहे. बऱ्याचदा तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, मधुमेहाचे निदान झाल्यामुळे तरुणांना सामाजिक दडपण येते. मधुमेहामुळे करिअर, लग्न, मित्रपरिवाराकडून मिळणारी वागणूक अशा अनेक समस्यांमुळे तरुणांमध्ये हा न्यूनगंड दिसून येत आहे.
मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले की, २३ ते ३० वयोगटांतील अनेक तरुण-तरुणींना टाइप-१ मधुमेहाचे निदान होते. मात्र, ते मधुमेह झाल्याचे लपवितात. अनेकदा या मुलांचे पालक फाइल घेऊन त्यांची औषधे घेण्यासाठी क्लिनिकला येतात. अंधेरीत राहणाºया २७ वर्षांच्या तरुणीवर मधुमेहाचे उपचार सुरू आहेत. ती उच्चशिक्षित असून, एका नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे, पण मागील दोन वर्षांपासून एकदाही ती क्लिनिकला आलेली नाही. तिची आई मात्र, नित्यनेमाने तिच्या प्रकृतीची प्रगती कळवून औषधे घेऊन जाते. तिच्याप्रमाणेच, आणखी एका २८ वर्षांच्या तरुणाला साधारण ३-४ महिन्यांपूर्वी मधुमेहाचे निदान झाले. मात्र, निदान झाल्यापासून राहत्या घराच्या परिसरातील क्लिनिकमध्ये पुन्हा येणार नाही, असे त्याने सांगितले. घर-कार्यालयापासून दूर असलेल्या दुसºया क्लिनिकमध्ये जाऊन तो उपचार घेत आहे. अशा रुग्णांच्या मनातील भीती, वाटणारी लाज घालविण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर त्यांचे समपुदेशन करतो. त्यांच्याशी संवाद साधून मधुमेह हा गंभीर आजार नाही, याचे दडपण घेऊन नका, वेळीच घर- मित्रपरिवारातील लोकांशी संवाद साधा, असा सल्लाही दिला जातो. मधुमेहाचे निदान झालेल्या तरुणाईला लग्न जुळताना समस्या येतात. कारण आजही मधुमेह हा आपल्या समाजात गंभीर आजार मानला जातो. मात्र, प्रतिबंधात्मक उपायांनी त्यावर नियंत्रण मिळविता येते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, तसेच काही तरुण-तरुणींसाठी मधुमेह हा करिअरच्या टप्प्यातील अडथळा ठरतो.
समुपदेशन गरजेचे
मधुमेहतज्ज्ञ डॉ. मिहीर राऊत यांनी सांगितले की, तरुणाईतील सामाजिक दडपणामागे विशिष्ट कारणे आहेत. मधुमेहाची औषधे घेताना बºयाचदा जीवनशैली आणि आहारावर बंधने येतात. सद्यस्थितीत ही बंधने पाळणे तरुणाईला शक्य नसते. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचा रोजचा दिनक्रम, सवयी बदलल्या आहेत. औषधोपचार करताना अनेक पथ्य पाळावी लागतात. सर्वच रुग्ण काटेकोरपणे याचे पालन करत नाहीत. शिवाय, केवळ मधुमेहच नव्हे, तर इतरही अनके आजारांबाबत तरुणाई हे दडपण बाळगून असते. अशा स्थितीत त्यांचे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, ही काळाची गरज आहे.