मधुमेही महिलेच्या गर्भालाही धोका
By admin | Published: November 14, 2015 03:37 AM2015-11-14T03:37:15+5:302015-11-14T03:37:15+5:30
ज्येष्ठ नागरिकांना होणारा मधुमेह आता तरुणांमध्ये सर्रास दिसू लागला आहे. करिअरमुळे अनेकांची लग्ने उशिरा होतात आणि बाळ उशिरा होते.
पूजा दामले, मुंबई
ज्येष्ठ नागरिकांना होणारा मधुमेह आता तरुणांमध्ये सर्रास दिसू लागला आहे. करिअरमुळे अनेकांची लग्ने उशिरा होतात आणि बाळ उशिरा होते. या आधीच त्या महिलेला मधुमेह झाल्यास गर्भधारणा न होण्याचा धोकादेखील वाढत आहे. मधुमेह असताना गर्भधारणा झाल्यास बाळाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होण्याचा धोकाही संभवतो, असे मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले.
डॉ. गाडगे यांनी पुढे सांगितले, की मधुमेह झालेल्या महिलेला गर्भधारणा झाल्यावर उलट्या होणे, अन्नावरची इच्छा उडणे, असे त्रास प्रामुख्याने जाणवतात. या महिलांना जेवणाआधी इन्सुलिन घ्यावे लागते. पण जेवणानंतर त्यांना उलट्या झाल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या महिलांची साखर स्थिर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. मधुमेह असलेल्या महिलेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. या मुलांना जन्मत:च मधुमेह असेल असे नाही. पण पोटात असताना ज्या परिस्थितीत त्यांची वाढ होते आणि जन्म झाल्यावर आसपासच्या वातावरणाचा त्यांच्यावर जो परिणाम होतो. त्यामुळे त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो.
अशा परिस्थितीत मूल मोठे झाल्यावर त्याला सकस आहार देणे गरजेचे ठरते. व्यायामाची आवडही लहानपणापासून लावायला हवी. मूल जसजसे मोठे होते तसे ते अनुकरणशील बनते. त्यामुळे मुले हट्ट करून जंक फूड मागू लागतात. स्मार्ट फोनशी तासन्तास खेळतात. त्यामुळे मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढतो. लहान मुलांमध्ये टाईप २ डायबेटीसचे प्रमाण वाढत असल्याकडेही डॉ. गाडगे यांनी लक्ष वेधले.
गोरेगाव पूर्व येथे राहणाऱ्या १४ वर्षीय बाळकृष्ण शेरीगार याला मधुमेह झाला आहे. १३ आॅक्टोबर २०१५ रोजी बाळकृष्णला मधुमेह झाल्याचे निदान झाले. लहान असताना तो सुदृढ होता. पण काहीवेळा तो काम करताना अभ्यास करताना आळस करायचा. पण त्यावेळी आमच्या लक्षात आले नाही. रात्री त्याला लघवीसाठी उठावे लागायचे. त्याचे वजन अचानक कमी होऊ लागले.
तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याची तपासणी करायचे सुचवले, असे बाळकृष्णची आई चंद्रकला शेरीगार यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या, माझ्या आईला मधुमेह असल्यामुळे मलाही वयाच्या ३५ व्या वर्षी मधुमेहाने ग्रासले होते. त्यामुळे मुलाला मधुमेह असण्याची शक्यता आम्ही पडताळून पाहिली. तेव्हा त्याला मधुमेह असल्याचे निदान झाले. मधुमेहाचे निदान झाल्यानंतर बाळकृष्णच्या वागण्यात बदल झाला आहे.
मला डायबेटिस झाला आहे़ आता पुढे माझे कसे होणार, माझ्या करिअरचे कसे होणार, असा विचार बाळकृष्ण करीत असतो. त्याला याचे दडपण आले आहे. पण मधुमेह नियंत्रणात राहावा, यासाठी आम्ही त्याला व्यायाम करायला सांगतो. चालणे आणि योगासने करण्यावर आम्ही भर देतो. स्वत: माझा
मधुमेह नियंत्रणात राहावा म्हणून सकाळी चालायला जाते. योगा, प्राणायाम करते, असे बाळकृष्णच्या आईने सांगितले.