निदान वाढीव पाणीपट्टी रद्द करा
By Admin | Published: July 23, 2016 01:38 AM2016-07-23T01:38:29+5:302016-07-23T01:38:29+5:30
पाऊस चांगला झाला असला तरी पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा अद्याप समाधानकारक नाही.
पुणे : पाऊस चांगला झाला असला तरी पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा अद्याप समाधानकारक नाही. त्यामुळे आताच शहराला रोज पाणी देऊन भविष्यात संकट ओढवून घेऊ नये. मात्र गेले सलग ८ महिने पाणीकपात सहन करणाऱ्या पुणेकरांना दिलासा म्हणून त्यांच्यावर लादलेली वाढीव पाणीपट्टी निदान या वर्षीपुरती रद्द करा, अशी मागणी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी केली.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला ही धरणे भरली असल्यामुळे पुण्याला रोज पाणी सोडावे, अशी मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अलगुडे यांनी शुक्रवारी पानशेत, वरसगाव व खडकवासला या धरणांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र राऊत होते.
पालिका प्रशासनाने पुणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यासाठीच्या योजनेला सभागृहात मतदान करून मंजुरी घेतली गेली. या योजनेसाठी म्हणूनच पुणेकरांवर या वर्षी १० टक्के व नंतर दरवर्षी ५ टक्के याप्रमाणे वाढीव पाणीपट्टी लादली. २४ तास पाणी देणे दूरच राहिले, दिवसाआड पाणी देण्याची वेळ प्रशासनावर आली. जवळपास वर्षभर पुणेकर ही टंचाई सहन करीत आहेत. प्रशासनाने आता त्यांना दिलासा म्हणून या वर्षीची वाढीव पाणीपट्टी रद्द करावी, अशी मागणी अलगुडे यांनी केली.
(प्रतिनिधी)