धूम्रपानामुळे होणार्या फुप्फुसाच्या कर्करोगाचे निदान संगणकाद्वारे
By admin | Published: July 6, 2014 07:43 PM2014-07-06T19:43:13+5:302014-07-06T19:43:13+5:30
फझी एक्स्पर्ट : अकोल्याच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले नवे सॉफ्टवेअर
अकोला : धूम्रपानामुळे होणार्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचे संगणकीय निदान करणारी यंत्रणा अकोल्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केली आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान करण्यात व्यर्थ होणारा वेळ फझी एक्स्पर्ट नावाच्या या सॉफ्टवेअरमुळे वाचणार असल्याने, रूग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.
तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि धुम्रपानामुळे तोंड, घसा, फुप्फुस, पोट, किडनी आणि मुत्राशयाचा कर्करोग होतो. भारतात, विशेषत: महाराष्ट्रात फुप्फुसाच्या कर्करोगामुळे दगावणार्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. फुप्फुसाच्या या कर्करोगाचे निदान करण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित अकोलानजिकच्या बाभुळगाव येथील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण महाविद्यालयातील संगणक विभागाचे विद्यार्थी अभिषेक लालवाणी, अक्षय श्रीवास्तव, श्वेता भिरड आणि किंजल टांक यांनी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत सातारकर आणि डॉ. विकास विरवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
सलग सहा महिन्यात झपाट्याने वजन कमी होणे किंवा खोकलताना रक्त येणे, अशी लक्षणे दिसणार्या रूग्णाची रक्त तपासणी करून, तपासणीत आढळणार्या घटकांचे प्रमाण फझी एक्स्पर्ट नावाच्या या सॉफ्टवेअरमध्ये टाकताच कर्करोगाची तिव्रता आणि संबंधित सर्व माहिती लगेच कळते.
अनेकदा एमआरआय केल्यानंतरही शरीरात आढळून आलेली गाठ कर्करोगाची आहे किंवा नाही, याचे निदान करण्यासाठी बायोप्सी करावी लागते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कर्करोगाच्या गाठीचा आकार कळण्यास मदत होते.
ग्रामीण भागात व्यसनाधिनतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही केल्या व्यसन न सोडू शकणार्या व्यक्तीस कर्करोग आहे किंवा नाही, याची माहिती या सॉफ्टवेअरच्या मदतीने तातडीने मिळणे शक्य असल्याने ग्रामीण भागातील डॉक्टरही या प्रणालीद्वारे कर्करोगाचे निदान करू शकतील, अशी आशा या विद्यार्थ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
शिवाजी इंजिनिअरिंगच्या या विद्यार्थ्यांनी तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने हे सॉफ्टवेअर विकसित केले असल्याने, कर्करोगाचे निदान करण्यासाठी लागणारा वेळ वाचण्याची शक्यता असल्याचे संगणक विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत सातारकर यांनी सांगितले.