कुपोषणमुक्तीसाठी ‘संवाद पथक मोहीम’ !
By admin | Published: January 14, 2017 01:02 AM2017-01-14T01:02:46+5:302017-01-14T01:02:46+5:30
वाशिम जिल्हा परिषदेच्या मोहिमेची राज्य स्तरावर दखल.
संतोष वानखडे
वाशिम, दि. १३- कुपोषणाचे प्रमाण कमी करणे आणि कुपोषणासंदर्भात इत्थंभूत माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने राबविलेल्या गृहभेट संवाद मोहिमेची राज्य शासनाने दखल घेतली असून, आता ही मोहीम राज्यभर १२ ते २६ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे.
कॅलरीज आणि पोषक तत्त्वांची निरंतर कमतरता किंवा असंतुलन यामुळे जन्मत: अनेक मुले कुपोषणाला बळी पडतात. जन्मत: कमी वजन, आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, अतिसार, न्यूमोनिया, रक्तात लोहाची कमतरता, आयोडीनची कमतरता, अ जीवनसत्त्वाची कमतरता, अपूर्ण लसीकरण व जंत ही कुपोषणाची प्रमुख कारणे मानली जातात. याशिवाय माता आणि किशोरवयीन मुलींनादेखील अनेक समस्या भेडसावतात. या विषयासंदर्भात कुटुंबीयांशी सुसंवाद साधून त्यांची परिस्थिती समजून घेणे, आजार होऊ नये म्हणून सतर्कता कशी बाळगावी, यासह आरोग्य शिक्षणाची माहिती देण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेने १३ ते ३१ डिसेंबर २0१६ या दरम्यान गृहभेट संवाद मोहीम राबविली. या मोहिमेची दखल राज्य शासनाने घेतली असून, स्वतंत्र परिपत्रक काढून संपूर्ण राज्यभर ही मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. महिला व बाल विकास विभागातर्फे राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन, पोषण चळवळ अंतर्गत ही मोहीम राबवायची असल्याने, या मोहिमेचा शुभारंभ राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीपासून १२ जानेवारीला करण्यात आला.
किशोरींचा आत्मसन्मान जागविण्यासाठी, गर्भवती मातांच्या पोटी सुदृढ बाळ जन्मण्यासाठी, बाळाला स्तनपानाचा हक्क मिळवून देण्यासाठी, बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा घडविण्यासाठी कुटुंबीयांशी सुसंवाद साधता यावा, म्हणून ही मोहीम २६ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता व ५ वर्षांंपर्यंतची मुले व मुली यांना पोषणाचे महत्त्व आणि त्यापासून होणारे फायदे याविषयी समाजामध्ये विशेषत कुटुंबामध्ये चर्चा होणे व त्यांची मानसिकता बदलविणे, आहारसंदर्भात समाजात असलेल्या गैरसमजुती दूर करणे, माता व बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचे कार्य या मोहिमेंतर्गत करावे लागणार आहे.
कुपोषण, माता व किशोरवयीन मुलींच्या समस्या, पोषण आहार व संगोपनाच्या चुकीच्या पद्धती, यासंदर्भात वाशिम जिल्हा परिषदेने डिसेंबर २0१६ मध्ये गृहभेटीतून कुटुंबीयांशी संवाद साधणारी विशेष मोहीम राबविली. या मोहिमेतून अनेक बाबी समोर आल्या. त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे. वाशिममधील या मोहिमेच्या धर्तीवर आता राज्य शासनाने ह्यसंवाद पथक मोहीमह्ण सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गतही कुटुंबीयांशी संवाद साधला जात आहे.
- गणेश पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम.