जय महाराष्ट्र; १ मेपासून राज्यभरात 'हीरक महोत्सवी सोहळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 08:34 PM2020-02-12T20:34:44+5:302020-02-12T22:03:06+5:30
महाराष्ट्र राज्याचे हीरक महोत्सवी वर्ष राज्य शासनामार्फत थाटात साजरे करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई - महाराष्ट्र राज्याचे हीरक महोत्सवी वर्ष राज्य शासनामार्फत थाटात साजरे करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात येऊन 1 मे, 2020 पासून राज्यभरात कार्यक्रमांना सुरुवात करण्यास मंजूरी देण्यात आली.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये “महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त “हीरक महोत्सवी महाराष्ट्र” या विषयावर सादरीकरण करण्यात आले. यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मराठी नाटक, मराठी चित्रपट , लोककला, गड किल्ल्यांवरील वीर रसयुक्त कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील कार्यक्रम, समाज सुधारकांचा महाराष्ट्र, राष्ट्रामधील महाराष्ट्र, विश्वातील महाराष्ट्र, महाराष्ट्राची संत परंपरा, शास्त्रीय संगीत महोत्सव, आदिवासी संस्कृती महोत्सव, क्लिक महाराष्ट्र, कृषी संस्कृती, लोकवाद्य महोत्सव, लोककलाकारांचा मेळावा, कव्वाली महोत्सव, दुर्गा महोत्सव, शंभर वर्षाचा मराठी चित्रपट प्रवास इत्यादी विविध सर्वसमावेशक सांस्कृतिक कार्यक्रम विविध जिल्ह्यांत आयोजित करण्यात येणार आहेत.
त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची महती विषद करणारे कार्यक्रम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची तसेच राज्यातील ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांची परिपूर्ण माहिती देणारी सचित्र पुस्तिका (कॉफीटेबल बुक) प्रकाशित करणे, परदेशस्थ महाराष्ट्रीयांचा सहभाग असणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन, महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेची उकल करणाऱ्या सर्वंकष माहितीपटाची निर्मिती, राज्याच्या विविधांगी प्रगतीचे, संस्कृतीचे चित्रण करणाऱ्या जाहिरातींची निर्मिती करुन विविध राज्यात त्या प्रदर्शित करणे, “हीरक महोत्सवी महाराष्ट्र” या संकल्पनेवर आधारित दर्जेदार दृकश्राव्य आशय गीताची (थीम साँग) निर्मिती करणे अशा विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात येणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
त्याचप्रमाणे प्रत्येक प्रशासकीय विभागाने “हीरक महोत्सवी महाराष्ट्र” या संकल्पनेवर आधारित किमान एक योजना किंवा उपक्रम तयार करुन हीरक महोत्सवी वर्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.