लोकमत Sting...लिंगबदलाचा दावा करणारा मेजर बाबा 'असा' अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:35 AM2018-08-13T06:35:43+5:302018-08-13T11:52:05+5:30
स्मशानातील कोळसा आणि औषधाने लिंगबदल करण्याचा दावा करणाऱ्या मेजर बाबाचा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून पर्दाफाश केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील भोंदूबाबा बबन सीताराम ठुबे याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या ३० वर्षांपासून तो बिनबोभाटपणे लोकांना फसवत होता. त्याच्या दरबारात नेमके चालते तरी काय? आणि हे स्टिंग आॅपरेशन कसे पार पडले याचा सविस्तर वृत्तांत...
- मनीषा म्हात्रे
मुंबई : पारनेरच्या खेड्यात नेमके चाललेय तरी काय? याचा शोध घेण्यासाठी मुंबईहून सुरू केलेला प्रवास कान्हूर पठार या खेडेगावात येऊन थांबला. याच भागात राहणारा सासरा आणि जावयाच्या भोंदूगिरीची कीर्ती गावासह राज्यभरात पसरलेली दिसली. मात्र बाबाची ही भोंदूगिरी स्थानिक अंनिसचे कार्यकर्ते आणि पोलिसांपर्यंत कशी पोहोचली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सुरुवातीला कॉलेजचा विद्यार्थी अश्वीन भागवतसह बाबाचा सासरा माधवराव सोनावळ्याचे घर गाठायचे ठरवले.
गावात फक्त सोनावळे बाबा कुठे राहतात, हे विचारताच गावकरी एकत्र जमले आणि मळ्यातल्या टोलेजंग वाड्याकडे इशारा करून बाबाचे घर दाखविले. कुठून आलात? काय समस्या होती? असे प्रश्नही आवर्जून विचारले.
मुंबईहून आलेय. मुलगा होत नाही, बाबांकडून विधी करून घ्यायचं म्हणतो. गुण मिळेल ना, असे बोलताच गावकºयांनी ठामपणे ‘हो’ सांगितले. अहो त्यांच्याकडे मुंबईहून तर मंडळींची ये-जा सुरूच असते, असे सांगून ते निघून गेले. एक आजोबा घर दाखविण्यासाठी आले.
एखाद्या राजमहलासारखा उभारलेला बंगला. त्याच्या मोठ्या प्रवेशद्वारातून आत आलो. समोरच मोठी शेतजमीन. बंगल्याशेजारी वाहनांच्या रांगा. तर दुसरीकडे गाय आणि म्हशींचा गोठा नजरेस पडला.
बंगल्यातून काही माणसे पूजाविधी उरकून बाहेर निघताना दिसली. त्यांच्या हातात मंतरलेल्या चिबूडसह काही गोष्टी दिसत होत्या.
त्यांना कुठून आलात, असे विचारताच, सांगलीहून आल्याचे सांगितले.
बाबांच्या अनुयायांनी चौकशी करून आतमध्ये घेतले. बंगल्याच्या आतली सजावटही एखाद्या चित्रपटात दाखविण्यात येणाºया बंगल्याप्रमाणेच. सोफ्यावर बसलेले ७८ वर्षांचे माधवराव. त्यांच्या शेजारीच जमिनीचा वाद मिटविण्यासाठी बसलेली मंडळी. पुढ्यात विधीचे सामान.
याच दरम्यान पत्नी, सून हे त्यांना विधी आणि ग्राहकांचा निरोप पोहोचवत होते. बाबाने टेबलावरचे पैशांचे बंडल पत्नीच्या हातात सोपवले. आम्ही काही सांगण्यापूर्वीच सोनावळेने फक्त, कुठून आलात? नाव आणि कोणताही एक मराठी महिना सांगा?
प्रतिनिधी : जुन्नरहून आलेय. मराठी महिना चैत्र.
बाबा : काही मिनिटांनंतर एक कागद हातात सोपवला (त्यात दैनंदिन दुखणी त्याचबरोबर पडणारी स्वप्ने याची माहिती लिहिली होती) खरे आहे ना, असे विचारले.
प्रतिनिधी : हो... तुम्हाला कसे समजले? आता आमच्या अपत्याचा प्रश्नही मार्गी लावा. लग्नाला दोन वर्षे झाली, पण अपत्य नाही. त्यात जमिनीचा वाद सुरूय.
बाबा : दोष तुमच्यात आहे. विधी करावे लागतील. फक्त विश्वास असेल तरच या.
प्रतिनिधी : तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. अनेक अधिकारी, मोठ्या व्यक्ती तुमच्याकडे येतात.
बाबा : हे काय समोरच बसलेत.
(अधिकाºयाकडे विचारपूस)
प्रतिनिधी : कुठल्या विभागात काम करता सर...
अधिकारी : मी महसूल विभागात आहे. (असे बोलून त्याने मान खाली घातली.)
पुढे सोनावळेने त्यांच्या विधीसाठी सामान काढण्यास सुरुवात केली. टेबलावर नारळ, खिळे, लिंबू, कुंकू मांडण्यास सुरुवात केली.
विधी करण्यापूर्वीच आमची विचारपूस करून त्यांनी आम्हाला बाहेर पाठवले. जाताना हातात विधीसाठी ३१ हजार रुपये खर्च, नारळ, खिळे, लिंबू, कमळ, चांदीची डबी असे साहित्य आणण्याची चिठ्ठी दिली.
माधवराव सोनावळेकडून निघताना, मेजर बाबा विठ्ठल सीताराम ठुबेशी फोन करून त्याची भेटीची वेळ घेतली. अमावस्या सायंकाळी सुरू होत असल्याने, ७ ते १२ च्या मध्ये या! येताना शर्ट आवर्जून आणा, असेही म्हटले. त्यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विश्वासू पदाधिकारी सोबत हवा म्हणून खटाटोप सुरू झाला. ज्या महिला अधिकाºयाशी संपर्क झाला त्यांनी ७ वाजता येणे शक्य नाही, म्हणून स्थानिक कार्यकर्त्याचा फोन क्रमांक पाठवला. मात्र स्थानिक नकोच म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गुन्हे शाखेची मदत घेतली.
अमावस्येमुळे गावकऱ्यांची दारे लवकरच बंद झाली होती. चहूबाजूने पसरलेला काळोख. त्यात अधूनमधून भुंकणारे श्वान. ठरल्याप्रमाणे पोलिसांना तेथून २ किलोमीटर अंतरावर थांबवून रात्री साडेदहाच्या सुमारास तरूण-तरूणीसोबत ठुबेंचे घर गाठून दरवाजा ठोठावला.
बाबा : आलात. मला वाटले येणार नाही. आताच लोक गेले. अमावस्या ना... सकाळपासून गर्दी होती. आत गेलो आणि तुम्ही आलात. उशीर का झाला?
(असे म्हणत बाबा घराशेजारी असलेल्या खोलीत घेऊन गेले.)
देवांच्या फोटोंसमोर मांडलेली पुस्तके. हिशोबाच्या वह्या, पंचांग, धागा, ताईत, धाग्याने गुंडाळलेले ब्लाऊज, शर्ट, कापड, बाहुल्या, भिंतीवर लटकवलेला स्टेथोस्कोप अशा अडगळीतून वाट काढून आत बसलो.
गाडी खराब झाल्याचे कारण सांगून बाबांकडे विधीसाठी सुरुवात केली.
प्रकरण पहिले - पती वशीकरण
बाबा - शर्ट आणला का? आधी विधी करायचा की मुलाची तयारी?
तरूणी : विधीच करून घ्या.
बाबा : ही स्मशानातील राख आणि कोळसा आहे. (त्याच कोळशाने बाबाने शर्टवर चौकट केली. त्यावर चिन्ह काढले. तरुणीचं नाव. भरकटलेल्या पतीचं आणि प्रेयसीचं नाव लिहिलं. त्यावर कुंकू, राख टाकून मंत्र-जप सुरू केला. शर्ट धाग्याने गुंडाळून पेटत्या अगरबत्तीवर मंत्र-जप केला.) हा शर्ट घरात ठेव नाही तर जाळून टाक. सोबतच तांदूळ, सुपारी, साखर आहे. जेव्हा कधी पती घरी येईल तेव्हा, साखर, तांदूळ जेवणात द्यायची. ही सुपारी पाळीच्या रक्तात भिजवून उन्हात सुकवायची, नंतर तिची पावडर करून पतीला दे. बघ कसा तो तुझ्या मुठीत येतो. स्वर्गातही तो दुसºया स्त्रीकडे जाणार नाही.
प्रकरण दुसरे - अपत्यप्राप्ती
बाबा : आता औषधासाठी तासभर तरी जाईल. आता फक्त शांत राहून औषधांकडे लक्ष द्या. ही मायफळ पावडर आहे. हिचा अर्थच माय बनवणे. ही इतकी इफेक्टिव्ह आहे की जे काही शुक्राणू बनतात, ते थोडे असले तरीही एकत्र आणते. तर अनंतमूळ पावडर दोघाचे बॉडी टेम्प्रेचर समान ठेवते. मधुमेहाच्या महिलांना बाळ होत नाही, त्यावर गुळवेल पावडर गुणकारी. तर जे स्त्रीबीज अंडातून बीज बनून गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाशी येतात, पण तिथे ब्लॉक असेल तर पुढे येत नाही, तो मार्ग गुडमार्क पावडरमुळे मोकळा होतो. अश्वगंधा पावडरचा वापर शक्ती वाढविण्यासाठी होतो. अशा प्रकारच्या ४२ पावडर एकत्र करून औषध तयार केले आहे.
तरूण : एवढी औषधे... बाबा तुम्ही डॉक्टर आहात ना?
बाबा : मी १९७४ मध्ये पोद्दारमधून बीएएमस केले. तेव्हा आयुर्वेदाला महत्त्व नव्हते. त्यामुळे मीही दुर्लक्ष केले. अखेर आर्मीत १८ वर्षे काम केले. सुभेदार म्हणून निवृत्त झालो. तिथेही पंचांग बघायचो. भारतातील लोक ओळखतात मला. हे औषध एक चमचा खा. या औषधामुळे १० हजार मुलींना बाळ झाले आणि त्या सुखाने नांदत आहेत.
तरूण : हे ब्लाऊज कसले?
बाबा : पुरुषाला काही समस्या असेल तर शर्ट आणि महिलांसंबंधित काही समस्या असतील तर ब्लाऊजचा वापर होतो.
प्रकरण तिसरे - गर्भलिंग बदल
बाबा : तुमचा काय प्रॉब्लेम आहे?
प्रतिनिधी : बहिणीला दिवस गेले. सासरच्यांना मुलगा हवाय. तुम्ही गर्भलिंग, तसेच लिंगबदलही करता ना?
बाबा : हो. शेवटची तारीख सांगा. या तारखेवरून मुलगा होईल की मुलगी ते सांगतो. त्यानुसार बघतो म्हणत त्याने मुलगा की मुलगी होणार हे शोधण्यास सुरुवात केली....
चालकाला बोलावण्याच्या नावाखाली पोलिसांना फोन करून येण्याचा इशारा तिन्ही प्रकरणातील प्रतिनिधींनी केला... स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आत धडकताच, बाबाची बोबडी वळली. पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. जादूटोण्याच्या विविध साहित्यांसह ठुबेची उत्तर प्रदेशातील वैद्यकीय प्रमाणपत्रे, शाळेची प्रमाणपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याच्या घरातूनही औषधांचा साठा जप्त केला.
बाबाला अटक करताच, बाबाची पत्नी, मुलगा, मुलगी पसार झाले.
सध्या बाबा कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे.