दिब्रिटो, कुऱ्हेकर महाराज यांना पुरस्कार
By admin | Published: July 28, 2015 02:36 AM2015-07-28T02:36:14+5:302015-07-28T02:36:14+5:30
साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांना २०१३-१४ साठी आणि अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना २०१४-१५ या वर्षासाठी राज्य शासनाने ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार
मुंबई : साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांना २०१३-१४ साठी आणि अध्यात्माचे अभ्यासक कीर्तनकार मारोती महाराज कुऱ्हेकर यांना २०१४-१५ या वर्षासाठी राज्य शासनाने ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार सोमवारी जाहीर केले. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पुरस्कारांची घोषणा केली.
संत साहित्यावर उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे आहे. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण व प्रा. रामदास डांगे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने दिब्रेटो आणि कुऱ्हेकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली. सय्यद भाई, भास्करराव आव्हाड, चैतन्य महाराज देगलूरकर, डॉ. प्रशांत सुरू, सिसिलिया कार्व्हालो आणि गुरुप्रसाद पाखमोडे यांनी समितीत काम पाहिले.
आषाढी एकादशीच्या औचित्यावर या पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून, वरील दोन्ही पुरस्कार या मान्यवरांना स्वतंत्र कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तावडे यांनी सांगितले.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो : लेखक, साहित्यिक आणि विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठीमध्ये बायबल लिहिले असून, त्यांना यासाठी राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने यापूर्वीच सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संतांच्या कार्याविषयीचा त्यांचा गाढा अभ्यास असून, विशेषत: मराठी भाषेसाठी त्यांनी केलेले कार्यही वाखाणले जाते. हिंदू, बौद्ध, इस्लाम, जैन आदी धर्मसंस्कृतीचांही त्यांनी अभ्यास केला आहे.
मारोती कुऱ्हेकर : मारोती महाराज कुऱ्हेकर यांनी वयाच्या २३व्या वर्षी शालेय शिक्षण संपवून १९५६ साली अध्यात्मक ओढीने आळंदी येथे जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला. स्वत: कीर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यात पारंगत झाल्यानंतर ते स्वत: अध्यापकाच्या भूमिकेतून अध्यात्मिक विद्यादानाचे कार्य निस्पृहपणे करीत आहेत. अध्यापनाबरोबर कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून आजवर विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविण्याचे काम त्यांनी पाच दशकांहून अधिक काळ केले आहे. अनेक प्रबोधनकार आज त्यांच्यामुळेच समाजप्रबोधनाचे काम यथार्थतेने करीत आहेत. मारोती महाराज यांच्या वारकरी संस्थेस २०१७मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. (प्रतिनिधी)