"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 01:47 PM2024-10-30T13:47:41+5:302024-10-30T14:06:00+5:30
अनिल देशमुख हे वारंवार देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत आहेत त्याला आज फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मुंबई - मनसुख हिरेन हत्येवरून देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहे. मनसुख हिरेनची हत्या होणार हे त्यांना माहिती होतं की नव्हतं या प्रश्नाचं उत्तर अनिल देशमुखांनी द्यावे असं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यामुळे मविआ काळात घडलेले मनसुख हिरेन हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख प्रकरणावर आपण जर कोर्टाचे निर्णय वाचला तर अनिल देशमुखांवर आरोप लावणारे त्यांचे पोलीस आयुक्त, ते गृहमंत्री आणि मी विरोधी पक्षनेता. देशमुखांवरील आरोपाची दखल कोर्टाचे मुख्य न्यायाधीश घेतात. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलीस गुन्ह्याचा तपास नीट करत नाही त्यामुळे तपास सीबीआयला द्या असं कोर्ट सांगते, मग गुन्ह्याचा तपास सीबीआय करते. हे सगळे घडते त्यांचे सरकार असताना...आम्ही विरोधी पक्षात होतो. माझा एकच सवाल आहे. ते उत्तर देणार नाही. मनसुख हिरेनची हत्या होणार आहे हे त्यांना माहिती होतं की नव्हतं, याचे उत्तर अनिल देशमुखांनी द्यावे, बाकी मी काही विचारत नाही असं फडणवीसांनी म्हटलं. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच खरं बोलायला विचार करावा लागत नाही. खोटं बोलायला विचार करावा लागतो आणि खोट्याचा पर्दाफाश होतो. अनिल देशमुखांनी परवा ट्विट करून त्यांना जेलमध्ये किती त्रास झाला हे सांगितले. नोव्हेंबर २०२२ ला ते जेलमध्ये गेले, ११ महिने ते जेलमध्ये होते त्यात ८ महिने त्यांचे सरकार होते. मग जेलमध्ये त्यांच्या सरकारने त्रास दिला का...अनिल देशमुख यांनी आत्ताच हे बोलणे का सुरू केले. काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे गट यांचा एकत्रित थिंक टँक आहे. त्यांनी स्ट्रॅटर्जी तयार केली त्यात देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिना करायची तर आपण भाजपाला रोखू शकतो, मग अचानक एकेदिवशी कपोलकल्पित कथा अनिल देशमुखांनी सुरू केली. मग त्यातून पुस्तक लिहिलं असा आरोपही फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला.
दरम्यान, मी सदनात सांगितले, मनसुख हिरेनला गायब करण्यात आले आहे. त्याची हत्या होऊ शकते अशी शंका उपस्थित केली. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. माझं स्पष्ट मत आहे, मनसुख हिरेनची हत्या होणार हे माहिती होतं की नव्हते त्याचे उत्तर कधीतरी द्यावे लागेल. ते योग्यवेळी येईल. निवडणूक सुरू आहे. काही बोलले तरी त्याला राजकीय रंग येईल. चांदिवालांनी जर अनिल देशमुखांना क्लिनचिट दिली होती तर हा रिपोर्ट आमच्यासमोर थोडी आला. चांदिवाल आयोगाचा रिपोर्ट उद्धव ठाकरेंना सुपूर्द केला होता. मग का बरं त्यावर कार्यवाही झाली नाही..जर क्लिनचिट आली होती मग तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लगेच घोषणा करून टाकायला हवी होती. पण नाही केली. हा रिपोर्ट माझ्याकडे आला नाही. त्यावेळी ती कार्यवाही होऊन हा रिपोर्ट सामान्य प्रशासन विभागाकडे गेला, तो गृहमंत्रालयाकडे नाही असा खुलासा करत फडणवीसांनी चांदिवाल आयोगावरून ठाकरे-देशमुखांना दोषी ठरलं.