...एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ? राष्ट्रवादीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 06:00 PM2023-06-22T18:00:14+5:302023-06-22T18:00:36+5:30

'एकनाथ शिंदेंना उध्दव ठाकरे यांनी मानसन्मान दिला मात्र मुख्यमंत्रीपदावर बसूनदेखील त्यांना भाजपच्या इशाऱ्यावर चालावे लागते.'

Did Eknath Shinde feel guilty? NCP spokes person mahesh tapase question | ...एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ? राष्ट्रवादीचा सवाल

...एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ? राष्ट्रवादीचा सवाल

googlenewsNext

मुंबई- सत्तांतराचे बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती, या दिपक केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनाबाबत काही गोष्टींचा खुलासा मंत्री दीपक केसरकर यांनी नुकताच प्रसारमाध्यमांसमोर केला, त्यावर बोलताना महेश तपासे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना परमेश्वर दीर्घायुष्य देवो, परंतु ज्यापद्धतीने दीपक केसरकर यांनी बंडाबाबत काही गोष्टींचा खुलासा केला व बंड अयशस्वी झाल्यास काय झाले असते असे सांगितले, त्यातून स्वाभाविकच काही प्रश्न निर्माण होतात, असेही महेश तपासे म्हणाले. एकेकाळी अमर्यादित असे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये होते. ते ठरवतील ती पूर्व दिशा, एवढा मान उध्दव ठाकरे कुटुंबाने दिला होता याची आठवणही महेश तपासे यांनी करून दिली आहे. 

आज मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावर बसून देखील भाजपच्या इशाऱ्यावर चालावे लागते आहे, ही शोकांतिका आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत किती जागा शिंदे गटाला मिळतील याबाबत एकनाथ शिंदेंच्या आमदारांना व खासदारांनाच खात्री नाही, असेही महेश तपासे म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पूर्णपणे असहकार्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने 'राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' अशी ठळक जाहिरात वर्तमानपत्रात करुन भाजपला अंगावर घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुसऱ्या दिवशीच जाहिरातीचा मजकूर बदलवून घ्यावा लागला, इतका दबाव भाजपने मुख्यमंत्र्यांवर आणल्याचे चित्र होते. 

मंत्रिमंडळाचा विस्तार असो की, इतर कुठल्याही महत्वपूर्ण बाबींचे निर्णय असो, तेथे केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी हिरवा कंदील दाखवल्याशिवाय मुख्यमंत्री महोदयांना निर्णय घेता येऊ शकत नाही, हे सध्या महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे, असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला. बंडाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मनावर नक्कीच दडपण असू शकेल, परंतु त्यापेक्षा मोठा दबाव आज भाजपचा आहे, हे कोणी नाकारू शकत नाही असेही महेश तपासे म्हणाले.

Web Title: Did Eknath Shinde feel guilty? NCP spokes person mahesh tapase question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.