उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावेळी उपस्थित राहणे नरेंद्र मोदींनी टाळले ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 11:47 AM2019-09-14T11:47:40+5:302019-09-14T11:48:20+5:30
उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता उदनयराजेही भाजपमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकारण रंगतदार होण्याची शक्यता असून राष्ट्रवादीसाठी साताऱ्यातील संघटन कायम ठेवणे आव्हानात्मक होणार आहे.
नवी दिल्ली - छत्रपती शिवराजी महाराजांचे वंशज आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री अमित शाह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु, उदयनराजे यांच्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहणे टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. अनेकदा ही केवळ चर्चाच असल्याचे सांगण्यात आले होते. तर कधी उदयनराजे यांच्या अटींमुळे प्रवेश लांबल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, आज अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र प्रवेशापूर्वीच्या उदयनराजे यांच्या अटी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यामध्ये भाजप प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहावे आणि सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक विधानसभेसोबत व्हावी या दोन अटींचा समावेश होता. त्या भाजपने मान्य केल्याचे सांगण्यात येत होते.
उदयनराजे यांच्या अटींसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील स्पष्टीकरण दिले होते. पंतप्रधान मोदींच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करण्याची उदयनराजे यांची इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यात येईल, असं पाटील यांनी म्हटले होते. परंतु, आज उदयनराजे यांच्या पक्ष प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उदयनराजे सातारा मतदार संघातून लोकसभेवर खासदार म्हणून राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर साताऱ्यातून उदयनराजे यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ आता उदनयराजेही भाजपमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे साताऱ्यातील राजकारण रंगतदार होण्याची शक्यता असून राष्ट्रवादीसाठी साताऱ्यातील संघटन कायम ठेवणे आव्हानात्मक होणार आहे.