पूजा खेडकरने नाव बदलून परीक्षा दिली का? UPSC ने तपासली 15 हजार उमेदवारांची कागदपत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 05:56 PM2024-07-31T17:56:33+5:302024-07-31T17:56:58+5:30
आज UPSC ने पूजा खेडकरला दोषी ठरवत तिची निवड रद्द केली आहे.
Pooja Khedkar News :केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरवर (Pooja Khedkar) मोठी कारवाई केली आहे. UPSC आयोगाने पूजाची उमेदवारी रद्द केली आहे. तसेच, तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पूजावर कारवाई करण्यापूर्वी आयोगाने मागील 15 वर्षांचे रेकॉर्ड तपासले.
15 हजार उमेदवारांचे रेकॉर्ड तपासले
यूपीएससीने यापूर्वीच पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि कारवाईचे संकेत दिले होते. आपल्या नोटीसमध्ये पूजा खेडकर यांची नागरी सेवा परीक्षा-2022 ची उमेदवारी का रद्द करण्यात येऊ नये, अशी विचारणा आयोगाने केली होती. याप्रकरणी यूपीएससीने एफआयआरही दाखल केला होता. दरम्यान, पूजा यांनी यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे परीक्षा दिली होती का, हे तपासण्यासाठी UPSC ने 2009 ते 2023 पर्यंत पास झालेल्या 15,000 हून अधिक उमेदवारांचा डेटा तपासला. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आयोग आपली निवड प्रक्रिया आणखी मजबूत करणार आहे.
PRESS RELEASE JULY 31ST, 2024https://t.co/PHCTC1vAeipic.twitter.com/MNOMzdFgqI
— Union Public Service Commentary (UPSC) (@upsc_unofficial) July 31, 2024
खोट्या प्रमाणपत्रावर यूपीएससीने काय म्हटले?
पूजा खेडकरची खोटी प्रमाणपत्रे (विशेषत: OBC आणि PwBD श्रेणी) सादर करण्याच्या प्रश्नावर UPSC ने स्पष्ट केले की, ते केवळ प्रमाणपत्रांची प्राथमिक छाननी करतात. हे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिले आहे की, नाही हे तपासले जाते. प्रमाणपत्राच्या तारखेसारख्या केवळ मूलभूत गोष्टी तपासल्या जातात. उमेदवारांनी सादर केलेल्या हजारो प्रमाणपत्रांची सत्यता पडताळण्याचे अधिकार किंवा माध्यम आयोगाकडे नाही.
पूजा खेडकर चर्चेत कधी आली?
युपीएससी पास केल्यानंतर सुरुवातीच्या प्रशिक्षणासाठी पूजा खेडकर पुण्यात आली. पुण्यात आल्यानंतर तिने स्वतंत्र केबिन आणि कर्मचाऱ्यांची मागणी केली. याशिवाय, तिने आपल्या खासगी ऑडी वाहनावर महाराष्ट्र सरकार लिहून, त्यावर अंबर दीवाही लावला होता, ज्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. यानंतर तात्काळ तिची पुण्यातून वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. पण, हळुहळू तिच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढत गेल्या. आज अखेर आयोगाने तिची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.