‘त्या’ भाषणामुळे दंगल झाली का?
By admin | Published: April 14, 2017 02:19 AM2017-04-14T02:19:30+5:302017-04-14T02:19:30+5:30
हिंदू राष्ट्र सेना (एचआरएस) धनंजय देसाई याने दाखल केलेली फेरविचार याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. देसाई याने केलेल्या चिथावणीखोर भाषणाला
मुंबई : हिंदू राष्ट्र सेना (एचआरएस) धनंजय देसाई याने दाखल केलेली फेरविचार याचिका गुरुवारी उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली. देसाई याने केलेल्या चिथावणीखोर भाषणाला २०१४मध्ये मुस्लीम तरुणाची करण्यात आलेल्या हत्येचा कट म्हणता येईल का, असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
मोहसीन शेख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय देसाई याने उच्च न्यायालयाने फेरविचार याचिका दाखल केली. त्याची ही याचिका दाखल करून उच्च न्यायालयाने त्याला तात्पुरता दिलासा दिला आहे. २०१६ मध्ये पुणे सत्र न्यायालयाने त्याचा आरोप मुक्त करण्याचा अर्ज फेटाळला. या निर्णयाला देसाई याने उच्च न्यायालयाने आव्हान दिले आहे.
देसाई याने केलेल्या भाषणामुळे देसाई आणि अन्य आरोपींनी हत्येचा कट रचल्याचे सिद्ध होते का? ते ही भाषणाच्या पाच महिन्यांनतर? असे प्रश्न न्या. ए. एम. बदार यांनी गुरुवारच्या सुनावणीत उपस्थित केले.
२ जून २०१४ रोजी पुण्याच्या उन्नतीनगर येथे मोहसीन शेखवर २० जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, हडपसर येथे झालेल्या दंगलीमध्ये शेख याचा सहभाग होता. त्यामुळे देसाई यांनी चिथावणीखोर भाषण करत हिंदू युवकांनाही परिसरात हिंसाचार करण्यास प्रवृत्त केले. शेखवर हल्ला करताना संबंधित जमाव ‘धनंजयभाई जिंदाबाद’ अशा घोषणा करत होता.
धनंजय देसाई यांच्या सूचनेवरूनच मुस्लिम तरुणावर हल्ला करण्यात येत असल्याचे जमावातील एक जण दुसऱ्याला सांगत असल्याचे एकाने ऐकले. त्याने तशी साक्ष पोलिसांना दिली आहे.
तर देसाई यांच्या वकिलांनी देसाईचा शेखच्या हत्येत काहीही भूमिका नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. घटनेच्यावेळी देसाई तिथे नव्हता. त्यांनी २०१४ मध्ये भाषण केले होते आणि ही घटना जून महिन्यात घडली. पाच महिन्यानंतर या भाषणाचा संदर्भ घटनेशी लावला जाऊ शकतो का? असा प्रश्न
देसाई यांच्या वकिलांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)