छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकर यांचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 05:41 PM2024-08-30T17:41:50+5:302024-08-30T17:46:18+5:30
Prakash Ambedkar : पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेला? असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
अकोला : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेला? असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी अकोल्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, "धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळात देखील बाबासाहेबांचा, महात्मा फुले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असतील ते गावागावत बसवले गेलेत. त्यावेळी ते नुसते चबुतर्यावर बसवले गेलेत. मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही. पुतळे विद्रूप करण्याच्या, विटंबना करण्याच्या बातम्या आजवर आल्या आहेत. मात्र, पुतळा पडल्याच्या बातम्या माझ्या तरी बघण्यात अथवा ऐकण्यात नाही. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय?" असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
याचबरोबर, राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता ती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम तर यात केले गेले नाही ना? अशा संशयाला जागा आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेची माफी का मागत नाही? असाही सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मोठी कारवाई
मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच या घटनेविरोधात विरोधी पक्ष आणि शिवप्रेमींकडूना आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान, यादुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या दोन व्यक्तींपैकी चेतन पाटील यांना कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी कोल्हापूरमधून चेतन पाटील याला ताब्यात घेतले आहे. तर जयदीप आपटे हा अद्याप दुर्घटना घडल्यापासून फरार आहे.