राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:11 IST2025-04-21T17:04:32+5:302025-04-21T17:11:04+5:30
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
Nitesh Rane on Uddhav Thackeray and Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झालीय. आधी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतभेद विसरण्याबद्दल भाष्य केले आणि नंतर त्याला उत्तर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राच्या हिताचा हवाला देत किरकोळ वाद मागे ठेवण्याचे संकेत दिले. यावरुनच मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे सध्या राज ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत बोलत आहेत. पण हे रश्मी वहिनींना त्यांनी विचारलं आहे का असा खोचक सवाल नितेश राणे यांनी केला.
मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यापूर्वी उद्धव यांनी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा सल्ला घेतला होता का, असा प्रश्न नितेश राणे यांनी एबीपी हिंदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विचारला आहे. गेल्या काही दिवसांत, राज आणि उद्धव यांच्या झालेल्या भेटी आणि त्यानंतर एकत्र येण्याचा प्रस्ताव यावरुन विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावरुनच नितेश राणे यांनी रश्मी ठाकरेंचा उल्लेख करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
"उद्धव ठाकरे जे बोलत आहेत ते रश्मी ठाकरे यांना मान्य आहे का? उद्धव ठाकरेंची मर्जी आहे का? राज ठाकरेंबाबत अडचण उद्धव ठाकरेंना होती की त्यांच्या घरच्यांना होती. ३९ वर्षे माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केले आहे. राज ठाकरेंबाबत उद्धव ठाकरे यांना जास्त अडचण होती की रश्मी ठाकरे यांना हे विचारा. उद्धव ठाकरेंना कोण विचारत आहे. जर त्यांना सोबत यायचं असेल तर रश्मी ठाकरे यांना विचारलं पाहिजे की हे चालेल का. याबाबत बोलण्याआधी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरे यांना विचारलं होतं का? हेसुद्धा विचारायला हवं. ज्यांनी त्यांना जवळून पाहिलं आहे त्यांच्यामधीलच आम्ही आहोत," असे नितेश राणे म्हणाले.
"महाविकास आघाडीचं सरकार कोण चालवत होतं? ठाकरेंच्या सरकार कोण चालवत होतं? मातोश्रीपासून दहा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या वैभव चेंबर्सच्या चौथ्या माळ्यावर सर्व आयएएस आणि आयपीएस अधिकारी का जायचे? हे त्यांना विचारा. तिथे रश्मी ठाकरे आणि श्रीधर पाटणकर बसून सर्व गोष्टी करायचे. हे मी पहिल्यांदा बोललो नाही. हे सर्वांना माहिती आहे. आम्ही फक्त फॅक्ट सांगण्याची हिंमत ठेवतो," असंही नितेश राणे म्हणाले.