Nana Patole Answers Narendra Modi: रेल्वे आम्ही सुरु केल्या होत्या का?; नाना पटोलेंचे मोदींच्या आरोपांवर प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 07:19 PM2022-02-07T19:19:44+5:302022-02-07T19:21:05+5:30
Nana Patole Answers Narendra Modi's Loksabha Speech: कोरोनाच्या पहिल्या लाटेत डब्ल्यूएचओने सांगितलेले जर पाळले असते तर देशावर ही परिस्थिती आली नसती. उत्तर प्रदेशमध्ये प्रेतांचा खच पडला होता, ते पाप झाकण्याचा प्रयत्न आज नरेंद्र मोदी यांनी केला, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले.
देशात कोरोना काँग्रेसने पसरविल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. यावर आता काँग्रेसकडून प्रत्यूत्तरे सुरु झाली आहेत. गोव्यात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी कोरोना काळात मोदींनी देशाला वाऱ्यावर सोडले होते. लोकांना अन्न, जाण्यासाठी वाहने नव्हती. मोदींना काय वाटत होते? असा सवाल केला. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींनी आपले पाप झाकण्यासाठी काँग्रेसचे नाव घेतल्याचा आरोप केला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत डब्ल्यूएचओने सांगितलेले जर पाळले असते तर देशावर ही परिस्थिती आली नसती. उत्तर प्रदेशमध्ये प्रेतांचा खच पडला होता, ते पाप झाकण्याचा प्रयत्न आज नरेंद्र मोदी यांनी केला, असे प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिले. मोदी दरवेळी काँग्रेसचे नाव घेतात आणि निवडून येतात, असे किती दिवस चालणार? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्र काँग्रेसने युपी, बिहारच्या लोकांना तिकिटे काढून दिली, मुंबई रेल्वे स्थानकावर गर्दी जमा केली, यामुळे देशात कोरोना पसरल्याचा आरोप मोदी यांनी केला. यावर देखील पटोले यांनी उत्तर दिले आहे. देशात रेल्वे कोणी सुरु केल्या? त्या काँग्रेसने केल्या का? मोदी किती खोटे बोलत आहेत, हे दिसतेय असे प्रत्यूत्तर देत युपीतील मृत्यू लपविण्यासाठी काँग्रेसचा वापर केला जात असल्याचे पटोले म्हणाले.
मोदी काय म्हणालेले...
पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतू काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला. मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर लोकसभेत उत्तर देत होते.