ऐकलं का...पहिल्यांदाच गावात एसटी आली!
By admin | Published: August 10, 2016 04:50 AM2016-08-10T04:50:25+5:302016-08-10T04:50:25+5:30
महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना देशात अजूनही अशी गावे आहेत की जिथे अजून एसटी बस पोहोचलेली नाही. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी खुर्दमध्ये
दावडी (जि. पुणे) : महासत्तेच्या दिशेने वाटचाल करताना देशात अजूनही अशी गावे आहेत की जिथे अजून एसटी बस पोहोचलेली नाही. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी खुर्दमध्ये मंगळवारी पहिल्यांदाच एसटी बस आली आणि गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
खेड सारख्या प्रगतीशील तालुक्यापासून अवघ्या १२ किमी अंतरावर खरपुडी खुर्द आहे. गावाची लोकसंख्याही बाराशेच्या आसपास. गावात प्रती जेजुरी म्हणून ओळखले जाणारे एक खंडोबाचे मंदिर असून राज्यभरातून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. परंतु आजतागायत गावात येण्यासाठी एसटीची सुविधा नव्हती. ग्रामस्थ, महिला, जेष्ठ नागरिक, वृद्ध व विद्यार्थी अशा साऱ्यांनाच जवळच्या शिरोली फाटा किंवा नदीपालिकडील खरपुडी बुद्रुक येथे जायचे असेल तर चार ते पाच किलोमीटर अंतराची पायपीट ठरलेली. ती अंगवळणीही पडलेली.
एसटी बस सुरू होण्यासाठी ग्रामस्थांनी कित्येक वर्षांपासून मागणी होती. खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे माजी अध्यक्ष संदिप गाडे, मल्हारी काळे व ग्रामस्थांनी राजगुरुनगर बसस्थानक प्रमुखाकडे पाठपुरावाही केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले व पहिल्यांदा गावात एसटी आल्यानंतर ग्रामस्थ व विदयार्थ्यांनी जल्लोष केला. चालक व वाहक यांना महिलांनी औक्षण केले. ग्रामस्थांनी खंडोबा देवाची तळी भरुन या एसटी बसची पूजा केली. (वार्ताहर)