कंपन्यांकडून एसटीला भेसळयुक्त डिझेल?
By admin | Published: April 24, 2016 04:42 AM2016-04-24T04:42:24+5:302016-04-24T04:42:24+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एस.टी. महामंडळ) पुरविल्या जाणाऱ्या डिझेलमध्ये तेल कंपन्यांच्या पातळीवरच भेसळ केली जाण्याचा एक मोठा घोटाळा गेले
- डिप्पी वांकाणी, मुंबई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एस.टी. महामंडळ) पुरविल्या जाणाऱ्या डिझेलमध्ये तेल कंपन्यांच्या पातळीवरच भेसळ केली जाण्याचा एक मोठा घोटाळा गेले कित्येक दिवस सुरू असावा अशी शक्यता बळावणारी परिस्थिती समोर आल्यानंतर या प्रकरणी तपास करण्याची विनंती ‘सीबीआय’ला करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
मागणी मोठी असल्याने एस.टी. महामंडळ ‘बल्क’ पद्धतीने डिझेल
खरेदी करते व तेल कंपन्या थेट
आपल्या शुद्धीकरण कारखान्यांमधून स्वत:च्या टँकरने पुरवठा करते. तेल कंपन्यांकडून पुरविल्या जाणाऱ्या डिझेलमध्ये भेसळ होत असल्याची व डिझेलची परस्पर चोरी होत असल्याची तीन प्रकरणे गेल्या काही महिन्यांत महामंडळाच्या दक्षता विभागाने पकडली असून त्याचे स्वतंत्र गुन्हेही नोंदविले आहेत. यात डिझेलमध्ये केरोसिन किंवा पाणी मिसळत असल्याचे दोन प्रकरणांत निदर्शनास आले आहे. तिसरे प्रकरण तर याहूनही धक्कादायक आहे. डिझेलच्या टँकरला एक छुपा पाईप जोडून त्यातून टँकरच्या इंधन टाकीत चोरून इंधन भरले जात असल्याचे या तिसऱ्या प्रकरणांतून उघड झाले. विशेष म्हणजे तिन्ही प्रकरणात टँकरचे सील जसेच्या तसे दिसून आले. त्यामुळे या भेसळीत चालकाचा हात असण्याची शक्यता निकाली निघाली आहे.
या भेसळ व चोरीची कार्यप्रणाली स्पष्ट करताना महामंडळाचे मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी विनीत अग्रवाल म्हणाले यांनी सांगितले, तेल कंपन्यांकडून डिझेल घेऊन येणारा प्रत्येक टँकर १२ हजार लिटर क्षमतेचा असतो. त्यात प्रत्येकी तीन हरा लिटरचे चार कप्पे असतात. टँकरच्या चारपैकी तीन कप्प्यांमध्ये शुद्ध डिझेल भरले गेल्याचे व चौथ्या कप्प्यात पाणी किंवा केरोसिनची भेसळ केलेले डिझल भरल्याचे आमच्या तपासात आढळून आले.
आणखी धक्कादायक म्हणजे या टँकरचे सील जसेच्या तसे आढळल्याचे टँकर भरल्या जाणाऱ्या तेल कारखान्यातच ही भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच टँकरसाठी जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसारही तपास करण्यात आला असता भेसळीत चालकाचा हात असण्याची शक्यता निकाली निघाली. डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरची जबाबदारी तेल कंपन्यांचीच आहे. एक तर हे टँकर तेल कंपन्यांच्या मालकीचे आहेत किंवा त्यांनी ते भाड्याने घेतले आहेत, असे अग्रवाल म्हणाले.
वाहतुकीत डिझेलची चोरी कशी होते हे सांगताना अग्रवाल म्हणाले की, टँकर जरी डिझेलची वाहतूक करीत असला तरी त्याला स्वत:च्या इंधनासाठी ४०० लिटर क्षमतेची स्वतंत्र टाकी असते. टँकरच्या चारपैकी एका कप्प्याला एक छुपा पाईप जोडून त्यातून टँकरच्या इंधनाच्या टाकीत डिझेल भरण्याची सोय केल्याचे एका प्रकरणात आढळून आले. म्हणजे भाड्याने वाहतूक करायच्या डिझेलपैकीच डिझेल चोरून ते टँकरसाठी इंधन म्हणून वापरायचे असा हा प्रकार आहे. अशा प्रकारे वाहतुकीत चार टक्के डिझेलची चोरी केली जाते.
या घोटाळ्यामागे मोठे जाळे असावे असा संशय असून त्याची सीबीआयमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे, असे सांगून अग्रवाल म्हणाले की, या प्रकरणी तीन गुन्ह्णांची नोंद झाली असून त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मी याचा तपास सीबीआयने करावा, अशी विनंती करणारे पत्र सीबीआयच्या सहसंचालकांना लिहिणार आहे. आरोपींविरुद्ध भेसळ आणि फसवणुकीच्या आरोपाखाली जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका टँकरमागे एसटीला ४०० लिटर डिझेलचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे आपण या संदर्भात वैध वजनमाप विभागालाही पत्र लिहिले आहे.
गुन्ह्याची तीन प्रकरणे...
१७-१०-१५ : वडाळा डेपोत भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डिझेलमध्ये पाणी मिसळल्याबद्दल इंडियन आॅईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
१७-७-१५ : निलंगा, लातूर येथे टँक भरून सांडताना आढळल्याबद्दल भारत पेट्रोलियम कंपनी लि. च्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास करतानाच भेसळ करणारा छुपा पाईप असल्याचे आढळून आले.
१३-४-१६ : डिझेलमध्ये केरोसिन मिसळल्याचे दिसून आले.
भेसळीचा मोठा फटका...
राज्यात बसगाड्या चालविण्यासाठी परिवहन महामंडळाला दररोज १० लाख लीटर डिझेल लागते. भेसळयुक्त डिझेलमुळे इंजिनवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे दुरुस्ती व देखभालीवर प्रचंड खर्च होतो.