डिझेल चोरणारी टोळी जेरबंद
By admin | Published: July 12, 2017 01:16 AM2017-07-12T01:16:45+5:302017-07-12T01:16:45+5:30
डिझेल चोरणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : महामार्गालगत थांबलेल्या गाड्यांच्या टाक्यांमधून रात्रीच्या वेळी डिझेल चोरणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. या संदर्भात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी मोरेश्वर इनामदार यांनी फिर्याद नोंदविली आहे. या प्रकरणी विजय ऊर्फ गुड्डू रामनरेश सिंग (वय ३८, पापडे वस्ती, फुरसुंगी, ता. हवेली, मूळगाव नंदनगर कॉलनी, बनारस, उत्तर प्रदेश), गणेश भाऊसाहेब मुरकुटे (वय ३७, शिरसवडी, ता. हवेली), सुभाष दगडू मालपोटे (वय ३५, वाडेबोल्हाई, ता. हवेली, मूळ गाव कातर खडक, ता. मुळशी), सिकंदर मुरली बेनबन्सी (वय ३३, पापडे वस्ती, फुरसुंगी, ता. हवेली, मूळ गाव मानापुर, पिंडरा बाजार, वाराणसी, उत्तर प्रदेश), सुशील ऊर्फ फक्कड राजमन बेनबन्सी (वय २७, रा. वाडे बोल्हाई, ता. हवेली), विकास श्रीपरमात्मा दुबे (वय २५, रा, वाडे बोल्हाई, ता. हवेली, मूळ गाव बौड्यार, ता. हरिया, जि. बस्ती, उत्तर प्रदेश), किरण विश्वनाथ बेज (वय १९, रा. सानपाडा, मुंबई) व आकाश अशोक हिरवे (वय २३, रा. हनुमाननगर, तुर्भे नाका, नवी मुंबई ) या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील विजय रामनरेश सिंग व किरण बेज हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. विजय सिंग याच्यावर जबरी चोरी, दरोडे, हत्यार प्रतिबंधक कायदा आदी गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
फरारी असलेल्या गुन्हेगारांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एक पथक नियुक्त केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, रौफ इनामदार, मोरेश्वर इनामदार, प्रमोद नवले, समाधान नाईकनवरे या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. हे पोलीस पथक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत केसनंद येथे असताना खबऱ्याकडून ही माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मध्यरात्री हवेली तालुक्यातील शिरसवडी गावच्या हद्दीत बोल्हाई वस्ती येथील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. या वेळी हे आठ जण तेथे हजर होते. महामार्गालगत उभ्या असलेल्या गाड्यांच्या टाकीमधील डिझेल चोरून काढून विकण्याचा व्यवसाय हे करत होते.
पोलिसांनी या ठिकाणाहून १२०० लिटर डिझेल, १६० लिटर पेट्रोल, मोकळे कॅन, इलेक्ट्रिक मोटार, हातपंप, पत्र्याची वेगवेगळ्या आकाराची मापे, एक टाटा इंडिका कार, एक पल्सर मोटारसायकल, एक तवेरा कार असा तब्बल ४०,३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुजबी कारवाई नको
लोणी काळभोर येथील पेट्रोलियम कंपन्यामधून भरून बाहेर पडलेल्या टँकरमधून पेट्रोल, डिझेल काढण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत भरपूर वाढले आहेत. या ठिकाणांवरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. या संदर्भात जुजबी कारवाई केली जाते, काही दिवसांतच परत हे धंदे जोमाने सुरू होतात.